राज्य सीईटी सेलला मोठी चपराक, बीएस्सी नर्सिंगचे प्रवेश बारावीच्या गुणांआधारेच

0
50

बीएस्सी नर्सिंग प्रवेशासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करणाऱ्या राज्य सीईटी सेलला चांगलीच चपराक बसली आहे. नर्सिंग प्रवेशासाठी संभाजीनगर खंडपीठाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्यामुळे आता राज्यातील बीएस्सी नर्सिंगचे प्रवेश बारावीच्या गुणांआधारेच होणार आहेत. प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी न्यायालयाने सीईटी सेलला 15 फेब्रुवारीपर्यंतचा अवधीही दिला आहे.

इंडियन नर्सिंग कौन्सिलने यंदाच्या बीएस्सी नर्सिंगच्या प्रवेशासाठी नीट यूजी परीक्षेमध्ये 50 टक्के पर्सेंटाईल मिळविण्याची अट ठेवली होती. या अटीविरोधात रितू गायकवाड, प्रतीक्षा पाटील या विद्यार्थिनी तसेच प्रायव्हेट नर्सिंग स्कूल ऍण्ड कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशन आणि असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट अनएडेड नर्सिंग कॉलेजने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. नीट यूजीमध्ये 50 पर्सेंटाईलपेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांनाही बारावीच्या गुणाआधारे या प्रवेशप्रक्रियेत भाग घेता यावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. संभाजीनगर खंडपीठाने ही याचिका निकाली काढत नर्सिंग अभ्यासक्रमाचे प्रवेश नीट यूजीऐवजी बारावीच्या गुणांआधारे घेण्याचे आदेश दिले होते.

नर्सिंग प्रवेशाच्या पहिल्या फेरीनंतर न्यायालयाचा निर्णय आला होता. पहिल्या फेरीत 1200 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. हे प्रवेश कायम ठेवत उर्वरित 5164 जागांसाठी नव्याने प्रवेशफेऱ्या राबविण्याचे आदेशही संभाजीनगर खंडपीठाने दिले होते. त्यासाठी सीईटी सेलला 31 डिसेंबरपर्यंत मुदतही दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने खंडपीठाचे आदेश कायम ठेवत प्रवेशाची मुदत 31 डिसेंबरऐवजी 15 फेब्रुवारी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती संजय कौल आणि न्यायमूर्ती अभय ओक यांच्या पीठासमोर सदर प्रकरणी सुनावणी झाली.

हे विद्यार्थी नर्सिंग प्रवेशासाठी पात्र

बारावी पीसीबी गटात इंग्रजी विषयात पास, यासह 45 टक्के गुण.

पीसीबी, इंग्रजी व ऍटिटय़ूड या 100 गुणांच्या परीक्षेत 50 टक्के गुण. (सर्वसाधारण गट)

Spread the love