प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शाळेत भाषण करणाऱ्या एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. लोकशाहीबद्दल बोलणारा हा मुलगा कमी वेळात भरपूर प्रसिद्ध झाला. या मुलाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली.
जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या रेवलगाव इथं जिल्हा परिषद शाळेत शिकणारा विद्यार्थी कार्तिक वजीर उर्फ भोऱ्या त्याच्या भाषणामुळे व्हायरल झाला होता. लोकशाहीबद्दल त्याने केलेलं भाषण अनेकांच्या पसंतीस उतरत होतं. या कार्तिकला दृष्टीदोष असल्याचंही समोर आलं आहे. कार्तिकची भेट घेतल्यावर त्याच्या उपचारासाठी त्याची मदत करणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी आता जाहीर केलं आहे.
प्रजासत्ताकदिनी #लोकशाही या विषयावर शाळेत केलेल्या अनोख्या भाषणामुळे प्रसिद्ध झालेला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारा विद्यार्थी चिरंजीव कार्तिक वजीर उर्फ भोऱ्याची आज वाटूर येथे भेट घेतली. pic.twitter.com/Q8bWVgBEkx
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 2, 2023
आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे म्हणतात, “प्रजासत्ताकदिनी लोकशाही या विषयावर शाळेत केलेल्या अनोख्या भाषणामुळे प्रसिद्ध झालेला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारा विद्यार्थी चिरंजीव कार्तिक वजीर उर्फ भोऱ्याची आज वाटूर येथे भेट घेतली.”
मदतीची घोषणा करताना एकनाथ शिंदे म्हणतात, “याप्रसंगी कार्तिक याच्या लोकशाही विषयावरील भाषणाकरिता अभिनंदन करित त्याचे मनापासून कौतुक केले. या भेटीमध्ये कार्तिकला दूरदृष्टीचा दोष आहे असे त्याच्या वडिलांनी सांगितले.त्याच्या डोळ्यांवरील उपचाराची सर्व जबाबदारी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत घेण्यात आल्याचे यासमयी जाहीर केले.तसेच लवकरात लवकर चिरंजीव कार्तिक याला ज्येष्ठ नेत्र चिकित्सक पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्याकडे नेत्र तपासणीसाठी मुंबईत आणण्यात येणार असून त्याच्यावर मुंबईतील सर्वोत्तम रुग्णालयामध्ये उत्तमोत्तम उपचार करण्यात येणार असल्याचे देखील जाहीर केले.”











