मुंबईसह राज्यात गोवरचा प्रसार वाढत असून आज राज्यात गोवर संशयितांची संख्या 10 हजार 234 वर पोहोचली आहे. यातील 658 जणांमध्ये गोवरचे निश्चित निदान झाले आहे. मुंबईतील गोवंडीसह ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हा, नवी मुंबई, भिवंडी, मालेगाव, पनवेल, वसई-विरार या भागात गोवर संशयितांची संख्या वेगाने वाढत आहे. मुंबई-महानगर क्षेत्रात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गोवर हा पाच वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये होणारा संसर्गजन्य आजार आहे. ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्यांची जळजळ, सुरुवातीला चेहऱयावर आणि नंतर संपूर्ण शरीरावर लालसर पुरळ ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. गोवरमुळे मुलांमध्ये अतिसार, मध्य कर्ण संसर्ग, न्युमोनिया, काही वेळा फेफरे, अंधत्व आणि मेंदू संसर्ग अशी गुंतागुंत होऊ शकते. लसीकरणामुळे हा आजार टाळता येतो. दरम्यान, राज्यात गोवर रुग्णसंख्या वाढत असल्याने संशयितांचा आकडा मुंबई – 3,831, मालेगाव – 757, भिवंडी – 446, ठाणे – 303, ठाणे जिल्हा – 117, वसई – विरार – 167, पनवेल – 131 व नवी मुंबई – 210 वर पोहोचला आहे.
मुंबईत एकाच दिवसात 32 बाधित
मुंबईत शनिवारी एकाच दिवसांत 116 गोवर संशयितांची नोंद झाली. तर 32 जणांमध्ये गोवरचे निदान झाले. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या आता 292 झाली आहे. तर संशयितांचा आकडा 3947 वर पोहोचला आहे. दरम्यान, मुंबई-महानगरात गोवर संशयित मृतांचा आकडा 13 झाला आहे. मात्र गेल्या दोन दिवसांत मुंबईत गोवर संशयित मृत्यू झाला नसल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना!
– ज्या भागांमध्ये गोवर उद्रेकजन्य परिस्थिती आहे त्या भागामध्ये नियमित लसीकरणाच्या नेहमीच्या डोस व्यतिरिक्त नऊ महिने ते पाच वर्षे या वयोगटातील मुलांना गोवर आणि रूबेला लसीची एक अधिकची मात्रा देण्यात यावी.
– राज्यात लसीकरण सुरू करावयाचे याचा निर्णय स्थानिक परिस्थितीनुसार घ्यावा. यामध्ये कोणत्या भागात सहा महिने ते नऊ महिन्याहून लहान बालकांमध्ये गोवरचे प्रमाण दहा टक्क्यांहून अधिक आहे याचा निर्णय संबंधित राज्याने घ्यावयाचा आहे.
– ज्या भागांमध्ये सहा महिने ते नऊ महिन्यांपेक्षा लहान बाळांमध्ये गोवर रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक असेल अशा भागामध्ये सहा महिने ते नऊ महिन्यांहून लहान वयाच्या बाळांमध्ये गोवर आणि रूबेला लसीची एक अधिकची मात्रा देण्यात यावी. या अधिकच्या मात्रेनंतरही या बालकांचे गोवर आणि रूबेला लसीकरण नियमित लसीकरण वेळापत्रकानुसार करण्यात यावे.











