चंद्रकांत पाटलांवरील शाईफेक प्रकरणी तीन पोलीस अधिकारी व सात कर्मचारी निलंबित

0
49

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या विधानाचे ठिकठिकाणी तीव्र पडसाद उमटत आहेत. याप्रकरणी विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. शनिवारी पुणे दौऱ्यावर असताना पिंपरी- चिंचवड येथील कार्यक्रमात भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या प्रकरणी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तीन पोलीस अधिकारी आणि सात पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

चंद्रकांत पाटील पिंपरी-चिंचवडमध्ये मोरया गोसावी महोत्सवासाठी आले होते. ते पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या एका कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. कार्यकर्त्याच्या घरून निघाल्यानंतर बाहेरच चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी समता दल संघटक मनोज भास्कर घरबडे (34, रा. पत्राशेड, पिंपरी), धनंजय भाऊसाहेब इजगज (29, रा. आनंदनगर, चिंचवड) आणि वंचित बहुजन आघाडीचे सचिव विजय धर्मा ओव्हाळ (40, रा. आनंदनगर, चिंचवड) या तिघांना अटक केली आहे.

कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी तत्काळ कारवाई केलेली आहे. यामध्ये गुन्हे शाखेचे एक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, दोन सहायक उपनिरीक्षक आणि इतर कर्मचारी यांना निलंबित करण्यात आलेले आहे.

निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे

1. पोलीस निरीक्षक सतीश नांदूरकर (गुन्हे शाखा, युनिट 2)

2. पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग समाधान सिसोदे (गुन्हे शाखा)

3. गणेश दत्तू माने (चिंचवड पो.स्टेशन)

4. ASI भाऊसाहेब मुरलीधर सरोदे (चिंचवड पो.स्टेशन)

5. ASI दीपक महादेव खरात (गुन्हे शाखा)

6. पो. हवालदार प्रमोद सूर्यकांत वेताळ (गुन्हे शाखा)

7. पो.नाईक देवा शिवाजी राऊत (गुन्हे शाखा)

8. पो. नाईक सागर दशरथ अवसरे (गुन्हे शाखा)

9. महिला पो. कांचन प्रशांत घवले (चिंचवड पो.स्टेशन)

10. महिला पो. प्रियांका भैय्यालाल गुजर (मुख्यालय)

Spread the love