केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात आज शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भात आवश्यक कागदपत्रांच्या आधारे, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनुप पांडे व अरुण गोयल या तिघांच्या पीठापुढे सुनावणी होत आहे. शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या याचिकेत त्रूटी असल्याचं सांगतानाच शिवसेना पक्षात फूट पडली नसून पक्ष पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचा युक्तीवाद केला आहे.
कपील सिब्बल यांनी आज शिवसेनेची बाजू मांडताना यासंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रं सादर केली. त्यासोबत शिवसेनेतील फूट ही कपोलकल्पित असल्याचं सांगितलं. या फूटीचा पक्षावर कोणताही परिणाम झाला नसून शिवसेना पक्ष कायम असल्याचं त्यांनी सांगितलं.
शिंदे गटानं केलेल्या याचिकेनंतर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर हे प्रकरण आलं असून या याचिकेतील त्रूटी कपील सिब्बल यांनी आज आयोगासमोर मांडल्या. शिंदे गटाची फूट ही काल्पनिक असून त्याचा पक्षावर कोणताही परिणाम झाला नसल्याचा जोरदार दावाही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे पक्ष चिन्हाचा निर्णय देण्याची घाई करू नये, अशी विनंती कपील सिब्बल यांनी यावेळी केली. शिंदे गट बाहेर पडला असला तरी मूळ शिवसेना पक्ष हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचं त्यांनी सांगितलं.
10 जानेवारी रोजी तब्बल दोन तास ही सुनावणी चालली होती. शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल व देवदत्त कामत यांनी तर शिंदे गटाकडून महेश जेठमलानी यांनी बाजू मांडली होती. पुढील सुनावणी 17 जानेवारीला होणार असे यावेळी सांगण्यात आले होते.
आज सुरू झालेल्या सुनावणीसाठी शिवसेना सचिव अनिल देसाई व आमदार अनिल परब उपस्थित झाले आहेत.
याआधी झालेल्या सुनावणीवेळी ‘शिवसेनेशी गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळविलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या विधानसभा सदस्यत्वाच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाचा यासंदर्भातील निर्णय येईपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण या पक्षचिन्हाबाबत कोणतीही सुनावणी घेऊ नये किंवा निर्णय करू नये. सर्वोच्च न्यायालयाने भविष्यात सोळा आमदार अपात्र ठरवले तर निवडणूक आयोगाचे हसे होईल’, असे निदर्शनास आणून देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज जोरदारपणे बाजू मांडली होती.











