कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई) बोर्डाने दहावी म्हणजेच आयसीएसई आणि बारावीच्या (आयएससी) परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बारावीची परीक्षा 13 फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. बोर्डाची अधिकृत वेबसाइट cisce.org वर परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेच्या तारखांसोबतच मंडळाने निकालाची संभाव्य तारीखही जाहीर केली आहे. त्यानुसार दहावी, बारावीचा निकाल मे 2023 मध्ये जाहीर होईल.
आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा 27 फेब्रुवारीपासून इंग्रजी भाषेसह सुरू होतील. बोर्डाच्या परीक्षेचा कालावधी 3 तासांचा असेल. विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्याच्या वेळेशिवाय प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 15 मिनिटे देण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वेदेखील नमूद केली आहेत. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेत जेवढे प्रश्न नमूद केले आहेत, तेवढेच प्रश्न सोडवायचे आहेत. उत्तरपत्रिकेवरील सर्व नोंदी केवळ काळय़ा/निळय़ा बॉल-पॉइंट पेनने करणे अपेक्षित आहे. तसेच कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण, डेस्क किंवा इतर प्रकारचे पॅल्क्युलेटिंग मशीन वापरण्याची परवानगी नाही. रफ वर्कसह सर्व काम त्याच शीटवर केले पाहिजे, ज्यावर उर्वरित उत्तरे दिली आहेत. या परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतल्या जाणार आहेत. सकाळी 9 वाजता सुरू होणाऱया परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना 8 वाजून 45 मिनिटांनी वितरित केल्या जातील. दुपारी 2 वाजता सुरू होणाऱया परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना 1 वाजून 45 मिनिटांनी वितरित केल्या जाणार आहेत.










