जुन्नर पुणे प्रतिनिधि: पौर्णिमा प्रकाश बुचके* येत्या काही दिवसांमध्ये आत्महत्येच्या खूप बाबी समोर येत आहेत. त्यात सर्वात जास्त युवा युवतींच्या आत्महत्येचा आकडा पाहायला मिळतो. आत्महत्या करणे एखाद्या अडचणींतून निघायचा मार्ग आहे का ? त्यातून काही साध्य होणार आहे का ?आपला जीव गेल्यानंतर आपल्यावरील जबाबदाऱ्या कोणी दुसरी व्यक्ती घेणार आहे का ? असे खूप प्रश्न आत्महत्येचा वेळेस पडत असतात .तरी देखील आपण इतकी हिंमत करतो की जे जीवन आपल्याला आपल्या आईबाबांनी दिलंय त्यांची काळजी न करता आपण नको तो मार्ग स्वीकारतो . मान्य आहे की आजकालच्या ह्या धावपळीमध्ये आपण आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी व कुटुंबासाठी वेळ काढणं थोड अवघड झालेलं दिसतं. आत्महत्या करण्याची कारणे खूप वेगळी दिसून येत आहेत. काहीजण प्रेमात धोका मिळाल्याने जीव देतात, तर काही अपयश सामोरी आल्याने आणि काही कौटुंबिक व लैंगिक अत्याचाराला कंटाळून स्वतःचा जीव देतात. आयुष्यातील अपयश,धोका,भीती,अपमान, अत्याचार,असमान वागणुक ,लग्नाला विरोध,घरातील सतत होणारी भांडण,सामाजिक बंधने ह्या गोष्टींना घाबरून स्वतःचा जीव घेणे ही गोष्ट कितपत बरोबर आहे याचा नक्की विचार केला पाहिजे.ज्या वयामध्ये आपण आपल भवितव्य घडवण्याच्या प्रयत्नात असतो तेव्हा आपल्यात प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते. जेव्हा आपण त्या अडचणीवर मात करून आपले पुढचे पाऊल योग्य मार्गी लावाल तेव्हा नक्की यश आणि आनंद भेटेल.
नेहमी लक्षात ठेवा जिथे तुमच्या पुढे प्रश्न उभा राहतो तर निश्चितच त्याचे काही उत्तर असेलच. उत्तर असल्याशिवाय प्रश्न कधीच उभा राहत नाही.त्यामुळे हारून न जाता प्रश्नांची उत्तरे शोधा व त्यातून शिका पण आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नका.आयुष्यात येणाऱ्या अडचणींना घाबरून राहण्यापेक्षा त्यातून पुढची वाटचाल कशी ठेवावी हे शिका , अडचणी जेव्हा येतील तेव्हा आयुष्यातील खूप अनमोल धडे शिकवून पण जातील. कोणी तुम्हाला अडचणींमध्ये , मानसिक तणावामध्ये चिडचिडेपणा, थोड्या वेळातच मूड बदलणे, लवकर राग येणे,सर्वांपासून लांब राहणे , एकट राहणे पसंद करणे, कुणासोबत काही मनातलं न बोलणे, कुणावर विश्वास नसणे अश्या खूप काही गोष्टी दिसून आल्या तर त्या लोकांचा आसरा बनत चला. त्यांकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्यांच्या मनातील भावना , काळजी, भीती समजून घ्यायचा प्रयत्न करा. कुटुंबातील व्यक्तींना विश्वासात घेऊन प्रत्येक गोष्ट त्यासोबत बोलत चला.
कुणाचा जीव गेल्यानंतर त्यामागची कारण शोधत बसण्यापेक्षा जीव व वेळ जाण्याअगोदर आपल्या परिवारातील, मित्र मैत्रिणींमधील समाजातील मानसिक त्रास असलेल्या व्यक्तींना वेळ द्या. जो जन्माला आलाय त्याचा आज ना उद्या मृत्यू लिखित आहे पण असच ह्या जगातून हारून जाण्यापेक्षा प्रयत्न करा आणि जे दिवस भेटत आहेत ते दिवस स्वतःसाठी ,कुटुंबासाठी ,आपल्या स्वप्नांसाठी आणि आपल्या समाजातील चांगल्या कार्यांसाठी जगत चला.












