अन म्हणे आम्ही विद्येच्या माहेरघरचे महात्मा फुले स्मारकाच्या एका फलकात चुकाच चुका

0
8

पुणे शहराला विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. त्या पुणे शहरात भारतातील महान समाज सुधारक, क्रांतीबा महात्मा जोतीराव फुले व त्यांच्या पत्नी भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक बांधण्यात आले आहे. मंगळवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी अगदी धावत पळत या स्मारकाला भेट दिली. कामाच्या व्यस्ततेमुळे तिथं फार वेळ देता आला नाही. या स्मारकाच्या जागेत सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्या अस्थि जतन करून ठेवलेल्या जागेवर लहानसे स्मारक उभारले आहे. त्या जागे जवळच संचालक, पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचालनालय यांनी लावलेला ‘महात्मा जोतीबा फुले यांची समाधी’ हा दहा ओळींचा एक फलक लावलेला आहे . हा फलक वाचला व अवघ्या दहा ओळीत दिसून आलेल्या चुकांमुळे त्यास वारंवार वाचण्यात खूप वेळ गेला.

कोणत्याच क्षेत्रातील तसा मी काही मोठा माणूस नाही. माझ्या सारख्या अत्यंत सामान्य वाचकास ज्या काही चुका दिसून आल्या त्या मी इथं मांडत आहे.

१) पहिल्या ओळीत नोव्हेंबर या शब्दा ऐवजी ‘नोव्हेंबार’ असा शब्द आलेला आहे . जो चुकीचा आहे.

२) दुसऱ्या व तिसऱ्या ओळीत यांची अंतिम इश्चा लिहिलेली आहे मात्र वाक्य पूर्ण झाल्या नंतर पूर्णविराम द्यायला पाहिजे होता मात्र तो न दिल्याने अर्थबोध होत नाही.

३) तिसऱ्या ओळीत घरामागील जागेच्या संबंधाने ‘बरवळ’ हा शब्द आलेला आहे. वास्तविक घारामागील जागेस ‘परसदार किंवा घरामागिल अंगण’ असे म्हटले जाते. बरवळ हा शब्द प्रामुख्याने डोंगराळ भागातील मोकळ्या जागेस वापरतात . बरवळ जागेत सहसा काही उगत नसते. मात्र परसदार मध्ये लोक लहानशी बाग करतात किंवा काही वेली लाऊन भाजीपाला घेतात. महात्मा फुले यांचा वाडा भरवस्तीत होता. ती सर्वच जागा चांगल्या प्रकारची होती. असे असताना त्या जागेस नापीक, डोंगराळ, एकांत दर्शवून फुलेंच्या वाड्याचे महत्व कमी करण्याचा भाग यात दिसून येतो.

४) पाचव्या ओळीत सरकारी अधिकाऱ्यानी असे शब्द आले आहेत . यातील अधिकाऱ्यानी हा शब्द चुकीचा असून एकतर हा शब्द ‘अधिकाऱ्यांनी’ असा किंवा एकाच अधिकारी व्यक्तीविषयी असल्यास’ अधिकाऱ्याने’ असा पाहिजे होता.

५) ओळ क्रमांक ६, ७ व ८ मध्ये ‘सावित्रीबाईनी’ असा शब्द आलेला आहे. हा शब्द अनादर वाचक आहे. हा शब्द एकतर सावित्रीबाईंनी किंवा सावित्रीबाई यांनी असा पाहिजे होता. सावित्रीबाईं विषयी अनादर दर्शवून जरी शब्द लिहायचा होता तरी तो ‘सावित्रीबाईने’ असा पाहिजे होता.

६) सातव्या ओळीत ‘अस्ती’ हा शब्द आलेला आहे जो पूर्णतः चुकीचा आहे. अस्ती हा शब्द अस्तित्व दर्शवितो. तिथं अस्ती या शब्दाऐवजी अस्थि हा शब्द पाहिजे होता कारण अस्थि हा शब्द व्यक्तीच्या शवास दहन केल्या नंतर त्याची शिल्लक राहिलेली हाडं या अर्थाने वापरला जातो. या ठिकाणी महात्मा फुले यांच्या अस्थि ठेवलेल्या आहेत तेंव्हा अस्थि हाच शब्द बरोबर ठरतो. हा अस्थि शब्द तसा दहाव्या ओळीत आलेला आहे मात्र तिथं तो अस्थि ऐवजी अस्थी असा आलेला आहे.

७) आठव्या ओळीत वसवलेल्या या पादुका असे शब्द आलेले आहेत. वास्तविक पादुका या संग्रहित ठेवल्या जातात त्या वसविल्या किंवा बसविल्या जात नाही. महात्मा फुले काही प्रसंगी पादुका ( लाकडी जोडे ) वापरत होते नाही असे नाही तेंव्हा कदाचित सावित्रीबाईंनी महात्मा फुले यांच्या अस्थि चा अस्थिकलश व पादुका सदर जागेत खड्डा खोदून सुरक्षित ठेवले असावे व आठवण म्हणून त्या जागेवर लहानशी वास्तू उभारली असावी. तेंव्हा’ ……. दिनांक ३० नोव्हेंबर १८९० रोजी सावित्रीबाईंनी महात्मा फुले यांच्या अस्थि व पादुका या जागेत ठेवल्या’ असे वाक्य हवे होते.

८) ९ व्या ओळीत महात्मा फुले यांची समाधी अशी वाक्यरचना आलेली आहे . वास्तविक इथं वाक्य पूर्ण झाले असल्याने वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायला पाहिजे होते मात्र पूर्णविराम च्या ऐवजी स्वल्पविराम दिला गेला आहे त्यामुळे त्या वाक्याचा अर्थबोध होत नाही . तसे महात्मा फुले यांची समाधी या शीर्षकाचा हा फलक आहे. यात ‘समाधी’ हा शब्द तसा संयुक्तिक ठरत नाही. वास्तविक व्यक्तीच्या शवास ( प्रेतास ) जिथं दफन वा दहन केले जाते त्या जागेवर बांधण्यात आलेल्या वास्तुस समाधी म्हणतात. इथं महात्मा फुले यांच्या केवळ अस्थि ठेवलेल्या आहेत. महापुरुषाच्या अस्थि त्यांचे काही अनुयायी गोळा करून आपापल्या घरी नेतात. काहीजण त्या अस्थि स्वताच्या घरातील देवघरात ठेवतात. काही जण त्या अस्थि सार्वजनिक ठिकाणी जमिनीत पुरून स्मारक उभारतात तर काही जण स्मारक उभारून त्यात अस्थि अत्यंत सुरक्षितरित्या ठेवतात. तेंव्हा अश्या स्मारकास वा वास्तुस समाधी म्हणत नसतात.

एका महापुरुषाच्या संबंधाने तयार केलेल्या अवघ्या दहा ओळीच्या साध्या फलकावर येवढ्या चुका दिसून येत असतील तर फलक तयार करणाऱ्याला एकतर त्या महापुरुषाचे मोठेपण वा कार्य माहीत नसावे वां त्यांच्या विषयी चीड असावी किंवा बेफिकीरीपणा असावा किंवा काहीतरी करायचे म्हणून करायचे ही मानसिकता असावी. या पद्धतीचे चुकीचे फलक लावून आपण त्या महापुरुषा विषयी कृतघ्न भाव दर्शवितो त्या महापुरुषाला न्याय देण्याचा प्रयत्न करत नसतो असे दिसते . असे जर असेल तर ते नक्कीच निषेधार्य आहे.

 

Spread the love