प्रतिनिधी | जळगाव संदेश न्यूज नेटवर्क
जळगाव -जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पीक कर्ज वितरण करताना बँकेकडून विड्रॉल स्लिप न देता एटीएमद्वारे पैसे काढण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बँकेच्या या निर्णयामुळे त्यांना इतर बँकांच्या एटीएमचा वापर करावा लागत असून त्यासाठी अतिरिक्त चार्जेस आकारले जात आहेत. परिणामी, आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अनावश्यक आर्थिक बोजा पडत आहे.
तसेच, एकाच एटीएम केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने शेतकऱ्यांना तासन्तास रांगेत थांबावे लागत आहे. अनेकदा एटीएममध्ये रोख रक्कम उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय अधिकच वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित बँकेने शेतकऱ्यांच्या सोयीचा विचार करून विड्रॉल स्लिपद्वारे व्यवहाराची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच एटीएमची संख्या वाढवावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.











