जळगाव, (प्रतिनिधी) -: शहरातील प्रेमनगर परिसरातील बजरंग बोगद्याजवळ करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या कामाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रात्रीच्या अंधारात करण्यात आलेले हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, प्रत्यक्ष पाहणीत डांबराचा थर हाताने सहज निघत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
मिळालेल्या माहितीनुसार, 30 मे रोजी सकाळी सुमारे 10 वाजेच्या सुमारास अनेक नागरिकांनी या कामाबाबत तक्रारी केल्या. तक्रारीची दखल घेत घटनास्थळी भेट दिली असता, मातीच्या रस्त्यावर केवळ डांबराचा अत्यंत पातळ थर टाकण्यात आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, हा थर हाताने थोडासा जोर लावताच निघत असल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची माहिती जळगाव महानगरपालिकेच्या उपमहापौरांनाही दिली. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर चर्चा केली. मात्र त्यानंतर ते निघून गेले.
दरम्यान, संबंधित अधिकारी घटनास्थळी येईपर्यंत तेथून न हलण्याचा निर्धार करण्यात आला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्रत्यक्ष पाहणीनंतर त्यांनी देखील काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे मान्य केल्याची माहिती मिळाली.
अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारास घटनास्थळी बोलावण्याचा प्रयत्न केला; मात्र ठेकेदाराने येण्यास नकार दिला. त्यामुळे “अधिकारी बोलावतात आणि ठेकेदार नकार देतो, नेमके कुणाचा हात कुणाच्या दगडाखाली आहे?” असा सवाल उपस्थित करण्यात आला.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना ठेकेदारावरील कारवाईबाबत जाब विचारण्यात आला. त्यावर अधिकाऱ्यांनी सोमवारपर्यंत सदर निकृष्ट काम पूर्णपणे काढून टाकून, संबंधित पट्टा तांत्रिक निकषांनुसार नव्याने व दर्जेदार पद्धतीने तयार करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या घटनेमुळे सार्वजनिक निधीतून होणाऱ्या विकासकामांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. हाताने निघणारे डांबर, घटनास्थळी येण्यास नकार देणारा ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची असहाय्यता यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
जनतेच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांमध्ये कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. नागरिकांनी अशा प्रकारच्या अनियमितता तात्काळ प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.











