कार–रिक्षाच्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू

0
2

भुसावळ | प्रतिनिधी : जितेंद्र काटे भुसावळ तालुक्यातील जामनेर रोडवरील कुऱ्हा पानाचे गावाजवळ पेट्रोल पंपानजिक कार आणि रिक्षामध्ये झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. १४ जुलै) दुपारी सुमारे ३.३० वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, वरणगाव येथील सिद्धेश्वर नगर परिसरातील रहिवासी प्रकाश जुलाल गायकवाड यांनी तक्रार दिली आहे. त्यांचा मुलगा हर्षल प्रकाश गायकवाड हा एमएच-२० ईके-३४४० क्रमांकाची रिक्षा घेऊन भुसावळच्या दिशेने जात असताना कुऱ्हा पानाचे गावाजवळील पेट्रोल पंपानजिक समोरून येणाऱ्या महिंद्रा कंपनीच्या एमएच-१९ सीव्ही-७०८१ क्रमांकाच्या कारने रिक्षेला जोरदार धडक दिली.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, कार चालकाने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन भरधाव वेगाने चालविल्याने हा अपघात घडला. धडक इतकी जोरदार होती की रिक्षाचालक हर्षल गायकवाड गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातात रिक्षेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या प्रकरणी कार चालक मनीष आदिनाथ संघवे (रा. खेडी बुद्रुक, ता. जि. जळगाव) याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०१३२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), २८१, १२५(ब), २२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल धिरज मंडलिक पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून, भरधाव वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Spread the love