खोके म्हटल्यावर शिंदे गटाला इतकं का झोंबतं? आदित्य ठाकरे यांचा थेट सवाल

0
46

अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी खोके सरकार या टीकेवरून आरोप करणाऱ्यांना न्यायालयात खेचू, असं म्हटलं होतं. त्याला जोरदार प्रत्युतर देताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर कडाडून टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिर्डीत पार पडलेल्या पक्षाच्या मंथन शिबिरात राज्य सरकारवर खोके घेतल्याचा आरोप केला जात असल्याचं म्हटलं होतं. खोके घेतले नसल्याचं तरी अजून कुणी बोललेलं नाही, अशी टीकाही सुळे यांनी केली होती. हा आरोप चुकीचा असेल तर नोटीस का पाठवली जात नाही, असा आरोपही विरोधी पक्षांकडून केला जात होता. त्यानंतर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी खोके सरकार या टीकेवरून आरोप करणाऱ्यांना न्यायालयात खेचू, असं म्हटलं होतं.

त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. खोके म्हटल्यावर शिंदे गटाला एवढं का झोंबतं? असा थेट सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यांना हे का झोंबतंय? हेही त्यांनी स्पष्ट करावं. खोके म्हणजे खोके असतात. त्याचा इतर काही अर्थ असेल, तर त्यांनी सांगावं हे आम्हाला, असं ते म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही टीका केली आहे. ते म्हणाले की, बांधावर जाऊन आम्ही पाहणी करत आहोत. दोनदा अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पण सरकार म्हणून कुणी पुढे आलेलं नाही. कृषिमंत्रीही गायब आहेत. उद्योगमंत्री काय करताहेत, हेही कुणाला माहिती नाही. कारण महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात आहेत. उद्योग आणि कृषी ह दोन महत्त्वाचे घटक कोलमडताना दिसत आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

Spread the love