मिंधे सरकारचा मंद कारभार, आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला

0
47

महाराष्ट्रात येणारे प्रकल्प मिंधे सरकारच्या निष्काळजीपणामुळे राज्याबाहेर जाण्याचे काही थांबलेले नाही. लाखो रोजगार देणारे वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस, सॅफ्रन ग्रुप हे प्रकल्प राज्याबाहेर गेले. आता कुवैतमधील एका कंपनीनेही विदर्भाऐवजी मध्य प्रदेशात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही काहीच हालचाल न करणाऱया मिंधे सरकारवर जोरदार टीका होऊ लागली आहे.

कुवैतची ‘रिफायनरी ऍण्ड फर्टिलायझर’ ही कंपनी विदर्भात 26 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होती, परंतु या कंपनीने आता ती गुंतवणूक मध्य प्रदेशात केली जाईल अशी घोषणा केली आहे. या कंपनीचे अधिकारी काही महिन्यांपूर्वी नागपूरमध्ये आले होते. विदर्भ आर्थिक विकास परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष शिवकुमार आणि प्रदीप माहेश्वरी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर त्यांची भेट घालून दिली होती. प्रकल्पासाठी आवश्यक जमीन, वीज, पाण्याची काहीच अडचण भासणार नाही असे सांगत गडकरी यांनी त्यांना विदर्भात गुंतवणूक करण्यास सांगितले होते, परंतु मिंधे सरकार आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) हा प्रकल्प विदर्भात यावा यासाठी काहीच पाठपुरावा केला नाही. मध्य प्रदेश सरकारने मात्र हा प्रकल्प आपल्या राज्यात यावा म्हणून सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळेच तो मध्य प्रदेशात जात आहे.

गुंतवणुकीसाठी सरकारकडून पाठपुरावाच नाही

नितीन गडकरी यांनी टाटा समूहालाही विदर्भात प्रकल्प उभारण्याबाबत विनंती केली होती. टाटा समूहाने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता; परंतु नंतर सरकार किंवा एमआयडीसीकडून पाठपुरावाच केला जात नसल्याचा विदर्भातील उद्योजकांचा आरोप आहे. विदर्भात ज्या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीची संधी आहे तिथे त्यासाठी सरकारकडून प्रयत्न झाले पाहिजेत, असे मत रिफायनरी व पेट्रोकेमिकल्स प्रकल्पाचे अभ्यासक प्रदीप माहेश्वरी यांनी व्यक्त केले आहे.

Spread the love