राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एसटीची हात दाखवा, बस थांबवा योजना सुरू करा, आदित्य ठाकरे यांची सूचना

0
43

मुंबईत 2015 मध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘हात दाखवा, बस थांबवा’ ही योजना बेस्टमध्ये सुरू केली होती. त्याच धर्तीवर गावांमध्ये एसटीमध्ये ‘हात दाखवा, बस थांबवा’ ही योजना सुरू करावी. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढेल, अशी सूचना शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत केली. शिक्षणामुळे देश पुढे जाऊन पुढची पिढी सुपरपॉवर होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शिक्षण विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना आदित्य ठाकरे यांनी शाळांमधील पायाभूत सुविधा, अभ्यासक्रम व सहशालेय उपक्रमांवर सरकारला विविध सूचना केल्या. पायाभूत सुविधांवर भर देताना शाळांचे तुटलेले दरवाजे, बंद टय़ूबलाइट, बाथरूमचे तुटके दरवाजे यावर लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. शाळेच्या भिंती स्वच्छ आणि वर्गात खेळती हवा व स्वच्छ शौचालये असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

पौष्टिक आहार गरजेचा

मध्यान्य भोजनाचे व पौष्टिक आहाराचे महत्त्व विषद करताना ते म्हणाले की, जास्तीत ठिकाणी मध्यान्य भोजन म्हणून खिचडी दिली जाते. आपण लहान मुलांच्या दृष्टिकोनातून विचार करावा. कारण लहान मुलांना रोज खिचडी खाऊन पंटाळा येईल. म्हणूनच महिला बचत गटांना सोबत घेऊन अक्षयपात्र, अन्नमित्र, इस्कॉन अशा संस्थांना एकत्र घेऊन जिल्हा व तालुक्यांमध्ये मध्यावधी किचन केले तर वेगवेगळे पौष्टिक पदार्थ शाळेमध्ये देता येतील. अशी सूचना त्यांनी केली.

व्हर्च्युअल क्लासरूमची गरज

मुंबई महापालिकेतील व्हर्च्युअल क्लासरूमची योजना सांगताना ते म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेच्या साडेसहाशे वर्गांमध्ये आम्ही व्हर्च्युअल क्लासरूम केली आहे. तशाच व्हर्च्युअल क्लासरूम राज्याच्या प्रत्येक शाळेमध्ये केल्या तर चांगल्या दर्जाचे शिक्षण सर्वत्र समानतेने दिले जाईल. राज्याच्या अनेक वेगवेगळय़ा जिह्यांमध्ये चांगले शिक्षण आपण देऊ शकतो अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मातीची मैदाने गरजेची

मैदानी खेळ व मातीच्या मैदानांचे महत्त्व सांगताना ते म्हणाले की, शाळांमध्ये मातीची मैदाने कमी होत आहेत. लंगडी, क्रिकेट, खोखो हे खेळ मातीच्या मैदानावर होत नाहीत. शाळांमध्ये कृत्रिम टर्फ येत आहेत, पण शाळांना पायाभूत सुविधा देताना मातीची मैदाने गरजेची आहेत.

राज्यात सीबीएससी, आयसीएसी बोर्ड

अभ्यासक्रमाबाबत सरकारला सूचना करताना ते म्हणाले की, आपले एसएससी बोर्ड आहेच, पण त्याच बोर्डासारखे सीबीएससी व आयसीएससी बोर्डही जिह्यांमध्ये येणे गरजेचे आहे. आम्ही मुंबई, ठाणे, संभाजीनगरमध्ये त्यासाठी प्रयत्न केले. दरवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली होती. पण मुंबई महापालिकेच्या शाळेत एक लाख विद्यार्थी वाढले आहेत. सीबीएससी व आयसीएससीच्या शाळेत चार हजार जागांसाठी दहा हजार अर्ज आले होते. त्यामुळे लॉटरी काढून प्रवेश द्यावा लागला.

सुरक्षित शाळा उपक्रम

मुंबई महापालिकेत राबवलेल्या सुरक्षित शाळेच्या योजनेची माहिती त्यांनी यावेळी दिली. शाळेच्या आतील व बाहेरील सुरक्षा असे दोन प्रकार आम्ही राबवले. त्याअंतर्गत शाळेच्या बाहेर पाचशे मीटर परिघात चांगले फुटपाथ, चांगले रस्ते, स्पीडब्रेकर याकडे लक्ष दिले तर शाळेच्या आत विद्यार्थ्यांवरील मधुमेहावर लक्ष पेंद्रित केले. कारण लहान मुलांमधील मधुमेहावर कोणी बोलत नाहीत. मधुमेह व्यवस्थापन गरजेचे आहे. टाइप वन व टाइप टू मधुमेहाचे व्यवस्थापन गरजेचे आहे. कारण त्यातून पुढचे विकार थांबवू शकतो. तसेच दातांची तपासणी केली पाहिजे. असाच प्रयोग राज्यात, शहरात व गावात करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Spread the love