शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाचा आमदारांचा पुन्हा एकदा समाचार घेतला. मंत्रिपदासाठी या लोकांना गळ्यात पोस्टर घालून उभं राहावं लागतंय, मला त्यांच्याबद्दल सहानभूती वाटते, असा टोला आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना लगावला.
शिंदे गटाच्या आमदारांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून निदर्शनं करत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात फलक झळकावले. याबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना टोले लगावले. ”ज्याची सर्वात जास्त भीती वाटते त्यांच्यावर स्लेजिंग जास्त केलं जातं. पण मला त्यांच्याबद्दल मला वाईट वाटतंय. यांना कुणाला तरी इम्प्रेस करण्यासाठी गळ्यात पोस्टर घालून उभं राहावं लागतंय. त्यांच्याबद्दल मला सहानभूती आहे. पण निदर्शन करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक नैराश्य दिसत होतं. शिवसेनेला जो प्रतिसाद मिळतोय, मी जिथे जिथे जातोय तिथे शिवसेनेला लोकांचं प्रेम मिळतंय. त्याबद्दल जी भीती त्यांच्या मनात बसलेली आहे त्यामुळे हे नैराश्य आलेलं आहे. ही गद्दारी महाराष्ट्राला पटलेली नाही हे त्यांना कळलंय. एका चांगल्या प्रामाणिक माणसाच्या पाठित खंजीर खुपसून ते निघून गेले आहेत. त्यामुळे त्यांना हे सगळं करावं लागत आहे. त्यांना आता पब्लिसिटी हवी आहे”, असे आदित्य ठाकरे म्हमाले.
”हे सर्व जण मंत्रिपदासाठी गळ्यात पोस्टर घालून उभे आहेत. खरंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, महिलांवरील अत्याचारसाठी किंवा जर ते महाराष्ट्रातील अनेक विषय घेऊन तिथे उभे राहायला हवे होते. त्यांनी जे चित्र दाखवलं त्यातून त्यांनी त्यांच्यावर जे संस्कार झालेयत तेच दाखवले”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
”आम्ही तुमच्यासाठी काय कमी केलं, जी मंत्रीपदं कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी सोडली नव्हती ती त्यांना दिली. तरी देखील यांनी गद्दारी केली. आणि आज या लोकांना मंत्रीपदासाठी गळ्यात पोस्टर लावून उभं केलं जातंय. त्यांना दिलेली स्क्रिप्ट वाचावी लागतेय. मला त्यांच्याबद्दल दुख व सहानभूती वाटते. पण हे हे सगळं असं करण्यापेक्षा चाळीस लोकांनी राजीनामे द्यावेत निवडणूकीला सामोरे जावं. जे काही जनतेच्या मनात असेल ते आपल्याला कळेल”, अशा शब्दात त्यांनी बंडखोरांवर निशाणा साधला.
माझे दौरे सुरुच राहणार
माझ्यावर दबाव आणण्यासाठी हे सगळं सुरू आहे. पण माझे दौरे सुरुच राहितील. कितीही आम्हाला संपविण्याचा प्रयत्न केला, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. तरी शिवसेना उभी राहिल. आम्ही फिरत राहू. जो यांचा खरा चेहरा आहे तो आम्ही जनतेसमोर आणत राहू, गद्दारीचा मुखवटा फाडत राहू”, असे आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना सुनावले.










