सर्वोच्च न्यायालयाच्या दट्टय़ानंतर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यात आली. देशमुखांविरोधात तपास यंत्रणेकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. त्यामुळे त्यांची अटक अयोग्य असल्याचा जोरदार युक्तिवाद देशमुख यांच्या वकिलांनी आज न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या समोर केला.
मनी लॉण्डरिंगप्रकरणी 2021 साली अटक करण्यात आलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयात अनेक महिने प्रलंबित असल्याने सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला फटकारले होते. त्यानुसार न्यायमूर्ती एन.जे. जमादार यांच्यासमोर आज सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी ज्येष्ठ कौन्सिल विक्रम चौधरी व अॅड. अनिकेत निकम यांनी युक्तिवाद केला. त्यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले की, साक्षीदारांच्या जबाबावर केस उभी करण्यात आली असून 100 कोटींचा आरोप असणे अपेक्षित असताना वास्तवात 4.75 कोटींचा अपहार झाल्याचे ईडीचे म्हणणे आहे. जर आरोप गृहमंत्र्यांविरोधात झाले होते तर पोलीस आयुक्त त्यांची बदली होईपर्यंत गप्प का बसले? त्यांनी आक्षेप का नाही घेतला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशमुख यांचे वय 72 वर्षे आहे. देशमुख हे फुप्फुस व मणक्याच्या आजारांनी त्रस्त असून त्यांना प्रचंड वेदना होत आहेत. त्यामुळे न्यायालयाने जामीन अर्जाचा सर्वांगीण दृष्टिकोनातून विचार करावा, असा युक्तिवाद देशमुखांच्या वतीने अॅड. विक्रम चौधरी यांनी केला आहे.











