मुंबई – राजकीय वर्तुळात शिंदे-ठाकरे या वादाची ठिणगी पडण्यापूर्वीच आणखी एक वाद सातत्याने चव्हाट्यावर येत होता. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात सातत्याने चर्चेत असलेला वाद म्हणजे ठाकरे आणि राणे कुटुंबीयांचा वाद.
राणे आणि ठाकरे कुटुंबाचं विळ्या भोपळ्याचं वैर वर्षानुवर्षे चालूच आहे. पण ठाकरे गटातील एका आमदाराच्या वक्तव्याने हे कट्टर वैरी एकत्र येणार का? अशा चर्चा सध्या रंगत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून नितेश राणे आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचा कलगितुरा रंगलाय. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर खालच्या पातळीची टीका केली जातीये. कुडाळमधील एका कार्यक्रमात बोलताना भास्कर जाधव घराबाहेर पडू शकणार नाहीत, असं वक्तव्य नितेश राणेंनी केल्याचा दावा जाधवांनी केला. आणि त्याच रात्री भास्कर जाधव यांच्या चिपळून येथील घरावर हल्ला झाला.
भास्कर जाधवांच्या घराच्या परिसरात दगड, काचेच्या बाटल्या आढळून आल्या. या हल्ल्यानंतर नितेश राणे म्हणाले की, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणेंना मानणारा एक वर्ग आहे. त्यामुळं जर तुम्ही खालच्या पातळीला जाऊन बोलणार असाल तर कार्यकर्ते संतापणारच ना. राणेंनी अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर या हल्ल्याला राणे समर्थन देत आहेत का?, अशा चर्चाही रंगल्या होत्या.
तसेच भास्कर यांनी नितेश राणेंना बेडूक,कोंबडी चोर म्हणत,राणेंची नक्कल देखील केली होती. याला प्रत्युत्तर देताना राणेंनी भास्करांना भटक्या कुत्र्याची उपमा दिली होती. यामुळं राणे आणि ठाकरे गटातील वाद अधिकच तापला.
पण आता या वादात एक नवीन ट्विस्ट आला आहे. झालं असं की, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी नारायण राणे ठाकरेंसोबत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. नुकतंच राजन साळवी म्हणाले आहेत की, नितेश राणे आमचा विरोधक आहेत.राणे कुटुंबीयांना समजायला हवं की, आज नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांना बाळासाहेब ठाकरेंचाच आशिर्वाद लाभला, म्हणून ते मोठे झाले. त्यामुळं त्यांनी माझ्यावर आरोप करणं चुकीचं आहे.
त्यानंतर मी शिवसेना प्रमुखांशी, शिवसेना पक्षाशी किती प्रामाणिक आहे, हे त्यांना सांगण्याची गरज नसल्याचंही जाधव म्हणाले. पण हे सांगताना त्यांनी एक अंदर की बात पण सांगितली. ‘ये अंदर की बात है, राणे कुटुंब हमारे साथ है’, असा दावा साळवींनी केला आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यामुळं आता ठाकरेंना सातत्याने धारेवर धरणारे नारायण राणे, खरंच ठाकरेंसोबत आहेत का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.











