भगवद्गीताही ‘जिहाद’ शिकविते !

0
42

काँगेस नेते शिवराज पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य, काँगेसने हात झटकले

जिहाद केवळ कुराण किंवा इस्लाम धर्मातच आहे असे नाही, तर तो अन्य धर्मांमध्येही आहे. भगवद्गीताही जिहाद शिकवते, असे वादग्रस्त आणि संतापजनक विधान देशाचे माजी गृहमंत्री आणि काँगेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांनी केले आहे. या विधानाचा सर्व स्तरांमधून निषेध होत असून हे वक्तव्य स्वीकारार्ह नाही असे म्हणत काँगेसनेही आता हात झटकले आहेत.

येथील एका कार्यक्रमात त्यांनी ही वादग्रस्त विधाने केली होती. जिहाद ही संकल्पना केवळ इस्लाम किंवा कुराणमध्येच आहे असे समजू नका. ती प्रत्येक धर्मात आहे. एखाद्याने तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तो तुमच्या अंगावर शस्त्रे घेऊन धावून आला तर तुम्ही पळून जाऊ शकत नाही. तुम्हालाही शस्त्रे हाती घेऊनच लढावे लागते, असे जिहाद सांगतो. भगवद्गीतेतही हाच उपदेश पेलेला आहे. ख्रिश्चन धर्माच्या लिखाणातही जिहाद आहे, इत्यादी वक्तव्ये त्यांनी केली आहेत. भगवद्गीतेची तुलना त्यांनी इस्लामी जिहाद या संकल्पनेशी केल्याने असंख्य हिंदूंनी सोशल मिडियावर संतप्त भावना व्यक्त केली आहे.

दोघांचीही सारवासारव

आपल्या विधानामुळे वातावरण तापणार हे लक्षात येताच शिवराज पाटील आणि काँगेस या दोघांनीही सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मुस्लीमांनी चागंली कृत्ये केली तरी ती जिहाद ठरविली जातात, असे मोहसीना किडवाई यांच्या घरी एका कार्यक्रमात आपल्याला सांगण्यात आले होते. त्या संदर्भात आपण बोलत होतो, असे स्पष्ट करण्याचा प्रयत्न शिवराज पाटील यांनी केला. तर शिवराज पाटील यांची विधाने व्यक्तीगत असून त्यांचा काँगेसशी संबंध नाही. काँगेसच्या दृष्टीने ही वक्तव्ये अस्वीकारार्ह आहेत, असे म्हणत काँगेसनेही हात झटकले आहेत.

अटक करण्याची मागणी

भगवद्गीतेचा नेमका अर्थ लक्षात न घेता शिवराज पाटील यांनी इस्लामी जिहादशी या ग्रंथाची तुलना केली आहे. त्यांनी समाजात संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न केला असून त्यांची विधाने द्वेषयुक्त आहेत. त्यामुळे त्यांच्यावर त्वरित गुन्हा सादर करुन त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी अनेक हिंदू संघटनांनी केली आहे. एकंदर या विधानांमुळे काँगेसची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.

Spread the love