महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात आणलेली हजारो कोटींची गुंतवणूक नव्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे दुसऱ्या राज्यात गेली. मात्र अजूनही ‘त्यांचे’ ‘12 ते 1 उत्सवाला परवानगी’ असेच सुरू आहे. ते महिला, बेरोजगार तरुण, शेतकरी यावर बोलायला तयार नाहीत. विशेष म्हणजे, दोघांमधील खरे मुख्यमंत्री कोण हेदेखील समजायला मार्ग नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज ‘ईडी’ सरकारला सणसणीत टोला लगावला.
मुंबईत आयोजित एका कार्यक्रम प्रसंगी आदित्य ठाकरे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही दावोसला गेलो असता 80 हजार कोटींची गुंतवणूक राज्यात आणली. यानंतर सरकार पाडलं गेलं. वेदांत फॉक्सकॉन, बलट्रक पार्क, मेडिकल डिव्हाईस पार्क हे प्रकल्प आपल्या राज्यातून इतर राज्यांत गेले. मात्र दोघांमधील जे कुणी खरे मुख्यमंत्री असतील ते बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाहीत.’ परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याकडे सरकारचे लक्ष नाही. मागणी करूनही ओला दुष्काळ जाहीर केला जात नाही. 100 रुपयांत शिधावाटप योजनेचेही तसेच झाले आहे. सरकारकडून केवळ मोठमोठय़ा घोषणा करण्यात येतात. मात्र कार्यवाही होत नाही, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी सरकारचा समाचार घेतला.
दीर्घकालीन उपाय करण्याची गरज!
इतर राज्यांतील मुख्यमंत्री आपल्याकडे येऊन सादरीकरण करीत आहेत. धोरणं सांगताहेत. मात्र बेरोजगारी, उद्योगांसाठी आपले मुख्यमंत्री इतर राज्यात गेल्याचे दिसत नाही. आम्ही डावोसमधून 80 हजार कोटींची गुंतवणूक आणली. मात्र सध्याचे सरकार या प्रश्नांबाबत बोलत नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. शहरी आणि ग्रामीण भागाला भेडसावणाऱ्या समस्या कायमस्वरूपी सोडवायच्या असतील तर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.











