वेदाच्या परमेश्वरा आधीही ‘ तू ‘ होतास असे सांगणारे बाबुराव बागूल

0
3

बाबुराव बागूल यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील विहितगाव या लहानशा गावात दिनांक १७ जुलै १९३० रोजी झाला . अगदी लहान असतानाच माटुंगा येथील लेबर कँप मध्ये त्यांच्या मावशीकडं ते राहायला येतात . माटुंगा येथील नगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेत असताना ते कविता करू लागले . मॅट्रिक पास झाल्यानंतर त्यांना १९५५ मध्ये माटुंगा येथील रेल्वेच्या यंत्रशाळेत कामगार म्हणून नोकरी मिळते . या आधी ते दादर येथील कोहिनूर मिल मध्ये कामगार होते . माटुंगा येथे ते राहत असलेल्या वस्तीत कामगार अधिक असल्याने कामगारांशी त्यांचा जवळचा संबंध येत असे . कामगार चळवळ , कामगार नेत्यांचे जाणे – येणे , ते नित्याने पाहत असतात . अनेक कामगार नेत्यांची भाषणे ते ऐकू लागतात . त्यातच त्यांची लोकशाहीर व कामगार नेते अण्णा भाऊ साठे याच वस्तीत राहत असल्याने यांच्याशी भेट होते व ते त्यांच्या भाषणाने , कार्याने प्रभावित होतात.

लहानपणापासून कविमनाचे असलेल्या बागूलांवर अण्णा भाऊ साठे यांच्या मुळे मार्क्स , लेनिन यांच्या विचारांचा प्रभाव पडतो , मार्क्स , लेनिन , गॉर्की , शरदचंद्र चॅटर्जी यांची पुस्तकं ते मोठयाप्रमाणात वाचतात व त्याच दृष्टिकोनातून ते आपले लिखाण करायला लागतात . मार्क्सवादा बरोबरच महात्मा फुले , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेशी त्यांची नाळ जुळलेली असते . पुढं त्यांची सुरत येथे बदली होते . कामाचा व्याप, जातीवरून होणारा त्रास यामुळे त्यांना पुरेसे लिखाण करता येत नव्हते , त्यामुळे १९६६ ला ते नोकरीचा राजीनामा देतात व मुंबई येथे राहावयास येतात.

नोकरीला असतानाच ते लिहू लागले होते . त्यांचा ‘ जेंव्हा मी जात चोरली होती ‘ हा कथासंग्रह १९६३ ला प्रसिद्ध झाला आणि साहित्याच्या क्षेत्रात मोठी खळबळ उडाली . पुढं त्यांचे मरण स्वस्त होत आहे , अघोरी , कोंडी , पावशा , सरदार , भूमिहीन , मूकनायक , अपूर्वा , सुड अशी एकापेक्षा एक सरस , दर्जेदार असलेल्या कथा , कादंबऱ्या प्रसिद्ध होत गेल्या . आंबेडकर भारत , दलीत साहित्य : आजचे क्रांती विज्ञान सारखी वैचारिक साहित्य लिहून त्यांनी आंबेडकरी विचारधारा मांडली . त्यांच्या एकूणच साहित्याने साहित्याच्या क्षेत्रात त्यांचे मोठे नाव झाले.

त्यांच्या साहित्याला महाराष्ट्र शासनाचा हरी नारायण आपटे पुरस्कार , महाराष्ट्र फाऊंडेशनचा गौरव पुरस्कार , कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार प्राप्त झाला आहे . यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ , नाशिक तसेच बोरिवली येथील शब्द द बुक गॅलरी तर्फे बाबुराव बागूल यांच्या नावे पुरस्कार दिला जाऊ लागला . धारावी येथे १९९९ मध्ये घेण्यात आलेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांना निमंत्रित केले गेले .

कथाकार बाबुराव बागूल यांची ‘ वेदा आधी तू होतास ‘ ही अतिशय गाजलेली कविता आहे . त्यांच्या या कवितेतील ‘ तू ‘ हा शब्द आजच्या माणसाच्या संदर्भाने आलेला आहे . त्यांनी या कवितेत मानवी प्रगल्भतेचे अफलातून वर्णन केलेले आहे . माणूस अगदी अनादी काळापासून कसा बुद्धिमान , शक्तिमान होता याची या कवितेतून साक्ष पटते . या माणसानेच देवाची , प्रेशिताची , सूर्याची , चंद्राची निर्मिती केली असून त्याने देवाचे जन्मोत्सव , प्रेशिताचे बारसे साजरे केले आहे व या माणसा मुळेच ही पृथ्वी सजीव आणि सुंदर आहे . असे ठामपणे म्हटले आहे .

या कवितेच्या माध्यमातून कवी बागूल माणूस वेदाच्या आधी होता असे सांगतात मात्र वैदिक परंपरा वेदाच्या आधी काहीच नव्हते असे मानते . वेद हे अपौरुषेय असल्याचे ते मानतात . ब्रम्हा ने ही सृष्टी निर्माण केली असून सृष्टी निर्माण करण्या आधी ब्रम्हाने जगाच्या सुखा करिता आधी वेद म्हटले अशी त्यांची धारणा आहे. ब्रम्हाच्या मुखातून ब्राम्हण जन्माला येण्याआधी वेद निर्माण झाले असल्याने ते अतिशय पवित्र आहेत . वेदाला संविधान मानून भारतात जी संस्कृती उदयास आली ती संस्कृती ‘ वैदिक संस्कृती ‘ म्हणून ओळखली जाते . त्या वैदिक संस्कृतीलाच कवी बागूल छेद देतात . वेदाच्या आधी माणूस होता असे प्रतिपादन करणे म्हणजे प्रस्थापित धर्मव्यवस्था नाकारणे होते .

ब्रम्हाच्या मुखातून वेद बाहेर आले तेंव्हापासून ते मौखिकदृष्ट्या पिढ्यानपिढ्या चालत आले . पुढं कृष्ण द्वैपावन यांनी ते संकलित केले व त्याचे चार विभाग करून संस्कृत भाषेत लिहिले . इथं ब्रम्हाने संस्कृत भाषेत वेद उच्यारले होते का ? असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो .तेंव्हा संस्कृतला तू संस्कृत म्हटले व संस्कृत संस्कृत झाले असे कवी म्हणू शकत होते , पण त्यांनी तसे न म्हणता माणसाने वेद लिहिले असे एकप्रकारे सांगितले . आणि माणसाची प्रगल्भता अधोरेखित केली .

कवी बागूलांनी या वाक्यातून क्रांतिकारकता दाखवली व त्याहीपेक्षा मोठी क्रांतिकारकता पुढील ओळीतून दाखवली . त्यात ते लिहतात ‘ वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास ‘ वैदिक संस्कृती नुसार वेदांचा देव ब्रम्ह आहे व ब्रम्हाने ही सृष्टी निर्माण केली आहे तेंव्हा ब्रम्हा आधी या जीवसृष्टीत कोणीच नव्हते . कवी मात्र ब्रम्हाच्या आधी माणूस होता असे सांगतो . तेंव्हा ते एकप्रकारे माणसाने ब्रम्हाला ब्रम्ह म्हटले आणि ब्रम्ह ब्रम्ह झाले असे दर्शवितात . त्यांची ही कविता माणसाला चार्वाक , आजीवक , वारकरी यांची आठवण करून देते . या सर्वांनी आपल्या विचारधारेतून वेदास व वैदिक संस्कृतीस विरोध केलेला आहे व माणसाला श्रेष्ठ मानले आहे . माणसाच्या प्रगल्भतेचे गोडवे गायले आहे .

त्यांचे एकूणच साहित्य अन्याय , अत्याचार या विरुध्द , गावकुसाबाहेर जगणाऱ्यांचे वास्तववादी जीवन रेखाटणारे , महिलांची घुसमट , अंधश्रद्धा , अनिष्ट चालीरीती मांडणारे आहे . त्यांच्या साहित्याने साहित्याच्या जगतात स्वतंत्र स्थान निर्माण केले असून ते अनेकांना प्रेरणा देत आहे .

क्रांतिकारी विचारांची कास धरणाऱ्या बाबुराव बागूल यांची आज जयंती . त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

जयसिंग वाघ  अजिंठा हाउसिंग सोसायटी , अजिंठा चौक, जळगाव 

संपर्क ….. ९८८१९२८८८१

Spread the love