अमेरिकेतील बौद्ध शांती पदयात्रा ( वॉक फॉर पीस भिक्खू पन्नाकारा यांनी वेधले जगाचे लक्ष

0
3

जगभरात बौद्ध धर्मातील थेरवादाचे अनुयायी मोठ्या संख्येने आहेत. यात भिक्खूणी संघ सुद्धा तेवढाच सक्रिय असून देश विदेशात ते थेरवादाचा प्रचार , प्रसार करीत असतात. साधारणतः १९९० पासून थेरवादी बौद्ध भिख्खू हे शांती पदयात्रा काढावयास लागले. कंबोडिया या देशात १९९० मध्ये गृहयुद्ध झाले असता आपण शांती पदयात्रा काढून राष्ट्रीय प्रश्न सोडवूया असे तिथले बौद्ध भिक्खू महा घोसानंद यांना वाटले व त्यांनी या संकल्पनेला मूर्त रूप दिले. कंबोडियात ज्या भागात गृहयुद्ध झाले होते तिथं अनेक लोक जखमी झाले होते , त्या भागात बॉम्ब फेकण्यात आले होते, अनेक ठिकाणी भूसुरुंग पेरण्यात आले होते अश्या भागातून भिक्खू घोसानंद यांनी शांती पदयात्रा काढली. त्यांचे ते धाडस पाहून देशात शांतता प्रस्थापित होण्यात बरीच मदत झाली. तेंव्हा पासून विविध देशांत या पद्धतीच्या शांती यात्रा थेरवादी मंडळी काढून बुद्ध विचार पसरविण्या बरोबरच राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय प्रश्न सोडविण्याचे, माणसं जोडण्याचे काम करू लागले.

दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ पासून अमेरिकेतील टेक्सास पासून सुरू झालेली शांती पदयात्रा दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी वॉशिंग्टन डी.सी. येथे समाप्त होत आहे . या शांती पदायात्रेचे नेतृत्व व्हिएतनाम येथील बौद्ध भिक्खू पन्नाकारा करीत आहेत. त्यांची ही अमेरिकेतील पहिलीच शांती पदयात्रा आहे, मात्र त्यांनी या आधी दक्षिण आशियात अश्या पदयात्रा काढलेल्या आहेत.

व्हिएतनाम येथील थेरवादी बौद्ध भिख्खू पन्नाकारा यांनी या शांती पदयात्रा ची सुरुवात केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध देशांतील २४ बौद्ध भिक्खू यात सहभागी झाले आहेत. आजच्या घडीला भिक्खू पन्नाकारा हे संपूर्ण अमेरिकेत चर्चेचा विषय झाला आहे. तिथं त्यांचे मोठे आकर्षण वाढलेले आहे. हजारो किलोमीटर वरून विविध सेलिब्रिटी त्यांना भेटण्यास येत आहेत . रस्त्याने लोक दुतर्फा गर्दी करून त्यांचे स्वागत करीत आहेत. अमेरिकेत त्यांचे १००००००  चाहते झाले आहेत.

अमेरिकेतील अध्यात्मिक गुरू म्हणून ओळख असलेल्या ऑड्री पियर्स या स्वतः चार तास गाडी चालवून पन्नाकारा यांना भेटण्या करिता साऊथ क्यारोली येथील सलुदा येथे भेटावयास आल्या असता पन्नाकारा यांनी त्यांचे स्वागत केले असता त्यांना अश्रू अनावर झाले. न्यूज डे या दैनिकाला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, मी आध्यात्मिक आहे पण धार्मिक नाही, मी त्यांना बघितले आणि मला शांती दिसली. एवढ्या संकटांना सामोरे जाऊन, थोडेही विचलित न होता ते चालत आहेत , चालतच आहेत यातच त्यांनी खूप काही सांगून टाकले जे आजच्या दैनंदिन घडणाऱ्या क्लेशदायक, हृदयद्रावक घटनांवर उपयुक्त आहे.

भिक्खू पन्नाकारा यांनी भारतात २०२२ मध्ये ११९ दिवस शांती पदयात्रा काढली आहे मात्र भारतात त्यांना अमेरिकेतील प्रतिसादापेक्षा कमी प्रतिसाद मिळाला, प्रसिध्दी माध्यमांनी त्याकडं दुर्लक्ष केले होते. अर्थात ते आपले कार्य प्रसिध्दी करिता वा जनतेच्या प्रतिसादा करिता करत नसतात. अमेरिकेत सुद्धा काही ठिकाणी त्यांच्यावर दगडफेक झाली, आग्नेय युनायटेड स्टेट मधून जातांना त्यांना विरोधाला सामोरे जावे लागले. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या मार्गात एक मोठे वाहन आले व त्याने यात्रेतील एका वाहनास जोरदार धडक दिली, यात दोन भिक्खू गंभीर जखमी झाले, त्यातील एकाचा पाय कापावा लागला. आर्थिक नुकसान सुद्धा झाले. असे असले तरी त्यांनी सदर शांती यात्रा थोडी सुद्धा थांबविली नाही . धडक देणाऱ्या गाडीच्या चालकाला कोणताही त्रास दिला नाही , त्याच्या विरुध्द पोलीस विभागात साधी तक्रार सुद्धा केली नाही उलटपक्षी त्याचे मंगल होवो अशी कामना व्यक्त केली .

अमेरिकेत भाषण करतांना पन्नाकारा यांनी सांगितले की , ” आम्ही कोणत्याच घटनेचा निषेध करीत नसतो . तर आधीच प्रत्येकात असलेली शांती जागृत करण्याचे ( माईंड फुल नेस ) काम करीत असतो . एकता आणि करुणा आपल्या प्रत्येकाच्या अंतर्मनातून सुरू होते आणि ती कुटुंब , समूदाय व समाजात पसरत असते . ते पसरविण्याचे काम आम्ही करत असतो “. या शांती पदयात्रा विषयी ते सांगतातंकी , ही पदयात्रा राजकीय विधानापेक्षा राष्ट्रीय स्तरावरील उपचारात्मक कृतीचे प्रतिनिधीत्व करते . माणसाच्या प्रत्येक थांब्यावर सजगता , आंतरिक गुण म्हणून शांती , क्षमा , उपचार आणि लोकांना जिथं आहात तिथं भेटण्याचे महत्व विषद करत असतो .

या शांती पदयात्रेच्या वाटेत काही ठिकाणी त्यांना दगडावरून , काही ठिकाणी काट्यावरून तर काही ठिकाणी काचावरून सुद्धा चालावे लागले . यामुळे त्यांच्या पायांना जखमा झाल्या मात्र ते हसतमुखाने चालतच राहिले . त्यांना संपूर्ण यात्रेत क्वचित विरोध झाला मात्र स्वागत जोरदार होत गेले . ख्रिसमसच्या दिवशी तर दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी ख्रिस्ती धर्मगुरूंनी त्यांचे स्वागत केले . चर्च मध्ये त्यांच्या करिता प्रार्थना केली . पॅट्रिक हिमचन क्रेग या ख्रिस्ती धर्मगुरूंनी रात्री त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन भाषण केले व सांगितले की , जगात शांतते साठी सार्वजनिक व त्यागापूर्ण पद्धतीने काम करणारे कोणीही असोत ते वंदनीय असतात . इथं एवढ्या मोठ्या संख्येने तुम्हा लोकांना व इथल्या विविधतेला पाहून मी थक्क झालो .

या शांती पदयात्रा विषयी तसेच ‘ शांतता ‘ या विषयी पन्नाकारा सांगतात की , शांतता हे एक स्वप्न नाही तर शांतता जिवंत आहे , खरी आहे व ती दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे . त्यांच्या या यात्रेतून अनेकजण प्रेरित होऊन नवनवीन उपक्रम सुरू करू लागले . रॉक हील येथील पेनी शेफर्ड यांनी सांगितले की या यात्रे पासून मी ‘ आज माझा शांत दिवस आहे ‘ हे पाच शब्द सकाळी उठल्या उठल्या लिहू लागली . या पाच शब्दांच्या एका ओळीने मला एक वेगळीच शांतता लाभते , मन प्रसन्न असल्या सारखे वाटते .

आज अमेरिका , भारत सह अनेक देशांत अनेक माणसं काहीसे भयभीत झालेले आहेत . काही देशांमध्ये युद्ध सुरू असून बरीच माणसं मरत आहेत . काही देशांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे . क्लेशदाई , घृणास्पद घटना घडत आहेत . सर्वत्र अशांत असे वातावरण आहे अश्या परिस्थितीत अमेरिकेत सुरू असलेली शांती पदयात्रा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे . समाजमाध्यमावर सर्वाधिक प्रसिध्दी मिळवत आहे . यातून एक बाब स्पष्ट दिसून येते की , जनतेला शांतता हवी आहे . त्यांना भलेही बुद्ध नको असेल , भलेही बौद्ध धर्म नको असेल पण त्यांना शांती हवी आहे , करुणा हवी आहे , मानवता हवी आहे . माणसाला नेमके काय हवे आहे हे या पदयात्रेने दाखऊन दिले आहे . हे प्रत्येक देशाच्या प्रमुखाने समजून घेतले तर जगाचे चित्रच बदलून जाईल .

आज १२ फेब्रुवारी २०२६ रोजी ही शांती पदयात्रा संपन्न होत आहे , भविष्यात त्याचे काय पडसाद उमटतात हे काळ सांगेलच . आपण या व अशा प्रकारे निघणाऱ्या प्रत्येक शांती पदयात्रेचे किमान स्वागत करू शकतो . निर्मळ मनाने आपण एवढे जरी केले तरी आपण शांततेच्या व मानवतेच्या जवळपास राहू शकतो . आणि एवढ्या धकाधकीच्या जीवनात हे सुद्धा काही कमी नाही

संपर्क …. ९८८१८२८८८१

Spread the love