रामदेव बाबांनी महिलांविषयी लज्जास्पद विनोद केला तेव्हा व्यासपीठावर उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. असे लज्जास्पद विधान केल्यानंतर अमृता वहिनी गप्प कशा काय बसल्या? असे विधान करणारा कोणीही असो त्याच्या सणसणीत कानाखाली बसायला हवी होती. अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत बाबा रामदेव यांच्यावर बरसले. महिलांनी कपडे घातले नाही तरी त्या जास्त सुंदर दिसतात! असे संतापजनक विधान ठाण्यात मिंधे गटाच्या महिला मेळाव्यात रामदेव बाबा यांनी शुक्रवारी केले होते. या विधानाचा राऊत यांनी समाचार घेतला.
एकीकडे तुम्ही महिला सबलीकरण, महिलांचे रक्षण अशा गोष्टी करत कायदे बनवता व ज्ञान पाजळता. मात्र त्याच वेळेस असंख्य महिलांसमोर एक बाबा भगवी वस्त्रे परिधान करून महिलांचा अपमान करतो. शिवाजी महाराजांचा अपमान होऊनही राज्यपालांच्या बाबतीत सरकार गप्प बसलय. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, सांगली खेचून घेण्याची भाषा केली, तरी सरकार तोंड शिवून गप्प बसलं आहे. आणि आता बाबा रामदेव यांच्या सारख्या भाजपच्या महाप्रचारकांनी महिलांविषयी अभद्र उद्गार काढले तरी सरकार गप्प बसलय. या सरकारची जीभ दिल्लीला गहाण ठेवली आहे का? असा सवाल यावेळी राऊत यांनी उपस्थित केला.
यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बुलढाणा दौऱ्याविषयी ते म्हणाले की, ठाकरे हेच खरं सरकार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे आज बुलढाण्यात शेतकऱ्यांशी संवाद साधायला जात आहोत. बुलढाण्यात आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आहे. अनेक विषयांवर शिवसेना पक्षप्रमुख आपल्या भूमिका व्यक्त करतील. ज्याप्रमाणे महाराष्ट्राचा अपमान कर्नाटकचे मुख्यमंत्री करत आहेत. त्याचप्रमाणे राज्यपाल आणि भाजपचे प्रवक्ते शिवाजी महाराजांचा अपमान करत आहेत. या सगळ्यांचा आज समाचार घेतला जाईल. आजच्या सभेला अनेक विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळणार आहे. भारतीय जयहिंद पार्टी यांनी देखील नुकताच पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्रात सध्या जे काही चाललय, त्यामुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सरकार नेमके आहे कुठे? आज इथे बोलण्यापेक्षा आम्ही बुलढाण्यातल्या सभेत बोलू. आजची विदर्भातली सभा ऐतिहासिक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वीरपुरुष ज्या मातेने आम्हाला दिला ती राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या भूमीध्ये आजची सभा आहे. त्या मातीमध्ये केवळ निष्ठा आणि इमान याचंच बीज रोवलं गेलं आहे. बेईमानांना तिथे लोकं अजिबात थारा देणार नाहीत. मराठवाडा आणि विदर्भ या जिजाऊंच्या भूमीत आजची ही विराट सभा होत आहे.











