40 गद्दारांसोबत कामाख्या देवी योग्य न्याय करेल, संजय राऊतांचा मिंधे गटावर घणाघात

0
45

आम्हाला आसामच्या मुख्यमंत्र्यांनी कामाख्या देवीच्या दर्शनाला बोलावलं आहे, असा दावा 40 बंडखोर आमदार करत आहेत. परंतु त्यांनी आम्हाला कधीच बोलावलं नाही कारण आम्ही पक्षांतर केलं नाही. कामाख्या देवी ही न्यायदेवता देखील असल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे जे 40 बंडखोर आमदार तिथे गेले आहेत त्यांच्या सोबत कामाख्या देवी देवी योग्य तो याय करेल. महाराष्ट्रावर अन्याय करून हे 40 गद्दार आमदार आसामला गेले होते. त्यामुळे कामाख्या देवी नक्की न्याय करेल. असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे गटावर केला आहे.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईत आसाम भवन बांधण्याच्या केलेल्या मागणी बद्दल राऊत म्हणाले की, नवी मुंबईमध्ये आसाम भवन आहे. महाराष्ट्रात सगळ्या राज्यांना जागा हवी आहे. मात्र महाराष्ट्राला कधी कोणी जागा देणार आहे का? कर्नाटकचे मुख्यमंत्री सोलापूर आणि जत खेचून घ्यायला निघाले आहेत. गुजरात आमचे उद्योगधंदे पळवत आहे. देशामध्ये खोके सरकार म्हणून मान्यता मिळालेल्या राज्यातील सरकारचं आसाम सोबत अचानक कोणतं नातं निर्माण झालं कळत नाही. आसामचे मुख्यमंत्री मूळचे काँग्रेसवाले आहेत. ते देखील पक्षांतर करूनच भाजपमध्ये आले आणि मुख्यमंत्री झाले. आत्ताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आधी शिवसेनेत होते नंतर ते भाजपमध्ये गेले. त्यामुळे पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचं नातं जुळलं असावं. परंतु आता मुंबईमध्ये जागा नाही. मुंबई व महाराष्ट्रात आसामची जनता गुण्यागोविंदाने राहत आहे. देशातील सर्व भाषा व भाषिकांचा आम्ही सन्मान करतो. शेवटी हा निर्णय राज्य सरकारने घ्यायचा असतो.

राज्यपाल व भाजपने शिवाजी महाराजांच्या केलेल्या अपमानाबद्दल ते म्हणाले की, संभाजी राजे भोसले आणि साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांची भावना ही महाराष्ट्राची भावना आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडीने सातत्याने या विषयावर आवाज उठवण्याचं काम सुरु ठेवलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील त्यासंदर्भात एक अल्टिमेटम दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपकडून ज्या प्रकारे केला जात आहे. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्याप्रकारे महाराष्ट्रावर हल्ले करत आहेत. या सर्वांच्या विरोधात आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. ज्यांना ज्यांना महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी श्रद्धा आहे, स्वाभिमान आहे, त्या प्रत्येकाने महाराजांची विटंबना करणाऱ्यांच्या विरोधात एकत्र यावं अशी आमची भूमिका आहे. आणि लवकरच यासंदर्भात निर्णय होईल.

देशात महागाई आणि बेरोजगारी हे दोनच मुद्दे आहेत. याच मुद्द्यावर भाजप सत्तेवर आली होती. आणि हेच मुद्दे भाजपला बुडवणार. जनता विसरलेली नाही त्यामुळे हीच जनता भाजपचा पराभव करणार. असे राऊत म्हणाले.

Spread the love