छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर मिळेल असा खणखणीत इशारा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारी विधाने सत्ताधारी भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने केली जात आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्यापाठोपाठ आता महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. लोढा यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता संजय राऊत म्हणाले की, ” सरकारमधील महत्वाच्या लोकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अपमान करण्याची स्पर्धा लागली आहे. कोण जास्तीत जास्त अपमान करतो याची ही मोठी स्पर्धा आहे. त्यात आता मंगलप्रभात लोढा यांची देखील एन्ट्री झाली आहे. मात्र महाराष्ट्राची आणि देशाची जनता डोळे बंद करून बसली नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं. आता लवकरच शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर मिळेल.”
नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की, ‘मंगलप्रभात लोढा हे महाराष्ट्राचे मंत्री असून ते मुंबईचे पालकमंत्री आहेत. ते एक उद्योजक असून पर्यटन मंत्री आहेत. निदान या राज्याच्या पर्यटन मंत्र्याला तरी शिवाजी महाराजांचा खरा इतिहास माहित असायला हवा. जगभरातील पर्यटक महाराष्ट्रत केवळ छत्रपतींचा इतिहास पाहायला येतात. आग्र्याला जाणारे पर्यटक शिवाजी महाराजांचा तेथील संघर्ष समजून घेण्यास जातात. असे असताना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना एका बेईमान माणसाशी करता? छत्रपती शिवराय बेईमान होते का? तुम्ही थेट छत्रपतींनाच बेईमान ठरवत आहात. भाजपच्या एका प्रवक्त्याने छत्रपतींना माफीवीर म्हटलं, राज्यपालांनी शिवरायांना ते नायक नसून ते जुन्या काळातले आहेत असं म्हटलं. आता लोढा यांनी छत्रपतींची बेईमान माणसाशी तुलना करून महाराष्ट्राचा पुन्हा एकदा अपमान केला आहे.’
खोके सरकार म्हणून देशात कुख्यात असणाऱ्या या सरकारमध्ये महाराजांचा अपमान करण्याची स्पर्धा लागली आहे का? यासाठी दिल्लीने काही बक्षीस लावले आहे का? ‘कौन बनेगा करोडपती’ सारखं ‘कौन करेगा छत्रपती का अपमान’ अशी स्पर्धा लागली आहे. रोज सरकारमधील एकजण उठतो आणि छत्रपती शिवरायांचा अपमान करतो. स्वाभिमान,अभिमान, इतिहास व हिंदुत्व या मुद्द्यावर शिवसेना सोडून गेलेल्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या 40 आमदारांना हा हिंदुत्वाचा आणि महाराष्ट्राचा अपमान नाही वाटत का? आता याला लवकरच चोख प्रत्युत्तर दिलं जाणार. असे राऊत यांनी म्हटले.
राऊत पुढे म्हणाले की, ‘राज्यपालांचा राजीनाम्यासाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीत जाऊन ठाण मांडून बसा. ते तुमच्या हातात आहे. निदान मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना एक पात्र तरी पाठवावं. कॅबिनेटने राज्यपालांविरोधात निषेधाचा ठराव तरी मंजूर करावा. मात्र हे लोक महाराष्ट्राला फसवत आहेत. छत्रपतींचा अपमान ते मूग गिळून बघत आहेत.’ असे राऊत म्हणाले.
नाशिक दौऱ्याविषयी राऊत म्हणाले की, ‘तुरुंगातून सुटल्यानंतर नाशिकचा माझा पहिलाच दौरा आहे. उत्तर महाराष्ट्र दौऱ्यानंतर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरणार आहोत. सुरुवात नाशिक मधून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन करत आहोत. महाराष्ट्रात भास्कर जाधव, सुषमा अंधारे, विनायक राऊत हे आमचे नेते फिरत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला लोकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बुलढाण्यातल्या सभेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातली जनता शिवसेनेची व पक्षाच्या नेत्यांची वाट पाहत आहे. आमच्यातले 40 खोके जरी गद्दारी करून गेले असले तरी शिवसेना ही जागेवरच आहे. जनताही शिवसेनेच्या पाठीशी आहे. शिवसेना संपली असे अनेकांना वाटत असेल पण शिवसेना वाढत आहे.











