जनतेला वाऱ्यावर सोडून हे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात व्यस्त!

0
47

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा दिल्लीवाऱया केल्या, मात्र महाराष्ट्रातील जनतेसाठी त्यांनी पेंद्र सरकारकडे मदतीची काहीच मागणी केली नाही. जनतेला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतःचे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात व्यस्त होते, असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

विधान भवनात आज विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला. 17 ऑगस्टपासून राज्याचे पावसाळी अधिवेश्न पार पडणार आहे. हे अधिवेशन अत्यंत वादळी ठरणार असल्याचे संकेत जयंत पाटील यांनी आज दिले. जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित असून अधिवेशनाचा कालावधी अत्यंत कमी आहे. त्यामुळे अधिवेशन वाढवण्यात यावे अशी मागणी होती, असेही पाटील यांनी सांगितले. गेल्या 40 दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत पूरस्थिती आहे. मराठवाडय़ातील बीड जिह्यात गोगलगाईंचे आक्रमण वाढले आहे. मात्र सरकार अजूनपर्यंत तिथे पोहोचले नाही, असा आरोपही पाटील यांनी यावेळी केला.

राज्यातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत जेथे जेथे शक्य आहे तेथे महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न असून याबाबत तिन्ही पक्ष स्थानिक पातळीवर निर्णय घेतील. समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्षालाही सोबत घेण्याचा प्रयत्न आहे. या पक्षांसोबत चर्चा करण्याचे अधिकार जिल्हास्तरावर दिलेले आहेत, असे पाटील यांनी सांगितले.

Spread the love