केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला. या बैठकीत 3 लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या कृषी कर्जावर दीड टक्के सवलत मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने काम करत आहे. त्यानुसार बैठकीत 3 लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या कृषी कर्जावर दीड टक्के सवलत मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या निर्णयाची माहिती दिली. या योजने अंतर्गत 2022-23 ते 2024-25 या कालावधीत 34 हजार 856 कोटी रुपयांची अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असल्याचेही त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात पुरेशी कर्जे मिळू शकतील, असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासोबतच क्रेडिट लाइन हमी योजनेच्या निधीतही वाढ करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.










