प्रतिनिधी – जगन्नाथ बाविस्कर
चोपडा :- श्रीक्षेत्र, पंढरपूर पुण्यनगरीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे महाराष्ट्रातील लाख्खो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असून दरवर्षी येथे वारकरी संकीर्तन पालखी पायी दिंडी पताका घेऊन आपल्या आराध्य दैवताचे दर्शन घेऊन तृप्त होत असतात. भक्तांना भक्तीभावाने देवासमोर भजन पुजन कीर्तन करता यावे यासाठीच तर मंदिरांची स्थापना करण्यात आलेली असते. असे असतांना पंढरपुर मंदिर समितीचे कार्यकारी सरकारी अधिकारी गजानन गुरव यांनी मंदिरातील सभामंडपात भजन कीर्तन करण्यास बंदी घातलेली आहे. सभामंडपात मंदिर समितीचे कार्यालय असल्याने कामकाज करतांना त्रास होतो,असेही वक्तव्य समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी केलेले आहे. याबाबत समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांना काहीच माहिती नाही व याची चौकशी करण्यात येईल असेही ते सांगत आहेत. मंदिरात भजन कीर्तनास बंदी करणे याबाबत वारकरी संप्रदाय व श्री विठ्ठल भक्तांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

“आम्हाला भजनांमध्ये व्यत्यय आल्यास मरणप्राय वेदना होतात” हे जगद्गुरु संत तुकोबारायांचे उद्गार मंदिर समितीचे प्रतिनिधी विसरले आहेत का ? या कार्यकारी अधिकाऱ्यांना भजन कीर्तनाच्या आवाजाचा त्रास होत असेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन घरीच बसावे. श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे देवालय आहे, कार्यालय नाही. समितीने आपले कार्यालय अन्यत्र ठिकाणी हलवुन हा निर्णय त्वरित रद्द करावा, अशी सूचक प्रतिक्रिया वेले ते पंढरपूर पायी दिंडीचे स्वागताध्यक्ष वारकरी जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी ह्या पत्रकांन्वये दिली आहे.











