मागील काही दिवसांपासून जोरदार बरसत असलेल्या पावसाने विश्रांती घेतली आहे. दोन दिवसांपासून राज्यात फारसा पाऊस पडलेला नाही. मात्र, असे असले तरी हवामान खात्याने पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
राज्यात पुढील चार दिवस पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नांदेड जिल्ह्यात पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भातीलही काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात येलो अलर्ट असणार आहे. तर कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता आहे. विदर्भात 13 आणि 14 ऑगस्ट रोजी पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे










