जळगाव : जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून खुनांच्या मालिका कायम असल्याने सर्वसामान्य जनतेत भीती पसरली आहे. यावल तालुक्यातील चितोडा येथे उधारीच्या वादातून तरुणाची झालेली हत्या तर जळगावातही झालेले खुनाच्या घटना ताज्या असताना जळगावात पुन्हा खुनाची घटना समोर आली आहे. वाळूच्या वादातून जळगावातील एसएमआयटी महाविद्यालयाजवळ भावेश उत्तम पाटील (आव्हाणे, ह.मु.निवृत्तीनगर, जळगाव) या तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी रात्री 11 ते 12 वाजेच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले.
भर रस्त्यावर झाला खून
जळगाव जिल्ह्यात दर आठवड्याला खून होत असून किरकोळ वादातून खून होत असल्याचे समोर येत आहे. दोन दिवसापूर्वी यावल तालुक्यातील चितोडा गावी एका तरुणाचा मध्यरात्री खून करण्यात आला होता. उधारीच्या पैशातून हा खून झाल्याचे समोर आले होते. यावलनंतर जळगावात देखील खून झाला असून मध्यरात्री भरवस्तीत भर रस्त्यावर भावेश उत्तम पाटील (30, रा.आव्हाणे, हल्ली मुक्काम निवृत्तीनगर) या तरुणाचा अज्ञातांनी खून केला आहे. मंगळवारी रात्री 11 ते 12 वाजेच्या सुमारास एसएमआयटी महाविद्यालयासमोरील 100 फुटी रस्त्यावर हा खून करण्यात आला.
जिल्हा पेठ पोलिसांकडून संशयीतांचा शोध सुरू
चाकूने सपासप वार केल्याने तरुण रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. खून करणारे संशयीत वाळू माफिया असून वाळू व्यवसायाच्या वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. खून केल्यानंतर संशयीत पसार झाले असून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करणे सुरू असून संशयीतांचा शोध घेतला जात आहे.










