महानायक अमिताभ बच्चन यांचे नाव, आवाज आणि फोटो वापराबाबत दिल्ली उच्चन्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. यापुढे अमिताभ यांच्या परवानगीशिवाय त्यांचा नाव, आवाज, फोटो वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अमिताभ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने देशातील सर्व टेलीकॉम ऑपरेटर्सनाही या संदर्भात आदेश दिले असून त्याबाबत नियम घालून देण्यात आले आहेत. आज न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून दिल्ली उच्च न्यायायलाचे वरिष्ठ वकिल हरीश साल्वे यांनी न्यायालयात सांगितले की, माझ्या क्लाइंटच्या अधिकारांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे त्यांची इच्छा आहे की त्यांचे नाव, आवाज आणि व्यक्तीमत्वाचा वापर परवानगीशिवाय होता कामा नये.
अमिताभ बच्चन यांच्या वकिलाने उच्च न्यायालयात असेही सांगितले की, अनेक कंपन्या त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे नाव, आवाज आणि फोटोंचा वापर करत आहेत आणि हे सगळं खूप वर्षांपासून सुरु आहे. आतातर ऑनलाईन लॉटरी आणि टीशर्ट सारख्या उत्पादनांवरही त्यांच्या परवानगीशिवाय फोटो आणि आवाज बिनदिक्कतपणे वापर होत आहे. एवढेच नाही तर अनेक संकेतस्थळांवर अमिताभ बच्चन यांच्या नावाने रजिस्टर केले जात आहेत. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व मलिन करण्याच्या हेतून केल्या जाणाऱ्या सर्व गोष्टींवर लगाम लावणे गरजेचे आहे.
बॉलीवू़डचे महानायक अमिताभ बच्चन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. यामध्ये अनेक कंपन्या त्यांची परवानगी न घेताच त्यांचे नाव, आवाज आणि फोटोंचा वापर करतात. यावर आज निर्णय देण्यात आला.











