मुंबई – काही दिवसांपूर्वी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली होती. रस्ता ओलांडताना त्यांना दुचाकीने उडवल्यानं ते डिव्हायडरवर आदळल्यानं त्यांना दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर बच्चू कडू यांचा अपघात झाला की घातपात होता? यावर जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र यावर आता खुद्द बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत चर्चेला पूर्णविराम दिला आहे. माझा अपघातच झाला होता, यात कुठलाही घातपात नसल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हटलं बच्चू कडू यांनी? प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाल्यानंतर यावर विविध प्रतिक्रिया आल्या होत्या. बच्चू कडू यांचा अपघात नाही तर घातपात आहे याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील करण्यात आली होती. या अपघातावर बच्चू कडू यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या अपघातावर चुकीच्या पद्धतीने प्रतिक्रिया आल्या आहेत, माझा अपघात झालेला आहे, यामध्ये घातपाताचा काही संबंध नाही. वाहन चालकाची चुकी नाही तर मीच गोंधळलेलो होतो. अपघाताचं राजकारण केलं गेलं शहानिशा करून राजकारण करावं, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.नेमकं काय घडलं होतं? बच्चू कडू यांचा अमरावतीमध्ये अपघात झाला होता. रस्ता ओलांडताना त्यांना दुचाकीने धडक दिली होती. या अपघातामध्ये बच्चू कडू हे डिव्हायडरवर आदळल्यानं त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच त्यांच्या पायाला देखील मार लागला होता. यानंतर हा अपघात नसून, घातपाताचा प्रकार असावा अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर बच्चू कडू यांनी यावर प्रतिक्रिया देत चर्चेला पूर्णविराम दिला आहे.











