मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचे महाराज पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या चर्चेत आहेत. गेल्या आठवड्यात नागपूरमध्ये त्यांच्या राम कथेचा कार्यक्रम आयोजित केला होता.
त्यांच्या याच कार्यक्रमातील दिव्य दरबारवर अंनिसकडून आक्षेप घेतला गेला. अखिल भारत अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराजांना त्यांच्यातील दिव्यशक्ती सिद्ध करण्यासाठी 30 लाख रुपयांचं बक्षीस आव्हान दिलं. यानंतर धीरेंद्र महाराजांनी नागपूरमध्ये हे आव्हान न स्वीकारता त्यांच्या दरबारात आव्हान स्वीकारलं. यावर आता श्याम मानव यांनी प्रतिक्रिया दिली.
ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते. काय म्हणाले श्याम मानव? श्याम मानव म्हणाले, “9 जानेवारीला आम्ही पत्रकार परिषद घेऊन धीरेंद्र महाराज दिव्य दरबारात जे दावे करतात त्याला आव्हान दिलं. हे महाराज दावा करतात की, ते भक्तांचं नाव आपोआप ओळखतात, भक्तांच्या वडिलांचं नाव आपोआप ओळखतात. एवढंच नव्हे तर त्यांचं वय आणि मोबाईल नंबरही सांगतात.
याशिवाय धीरेंद्र महाराज कोणत्याही भक्ताच्या घरातील कोणत्या खोलीत, कोणत्या कपाटात कोणती वस्तू ठेवली हेही सांगण्याचा दावा करतात. या दाव्यातील पहिल्या भागाला टेलिपथी आणि इंट्युशन म्हणतात. तसेच घरात जाऊन काहीही पाहू शकण्याच्या क्षमतेला अंतर्ज्ञान किंवा दिव्यशक्ती (क्लेरोयान्स) म्हणतात. मी दैवीशक्तीला कोणतंही आव्हान दिलं नाही, तर महाराजांच्या दिव्यशक्तीला आव्हान दिलं आहे,” अशी माहिती श्याम मानव यांनी दिली.
आव्हानासाठी अंनिसची अट “कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून दावा करणाऱ्यांपर्यंत माहिती पोहचू नये याची काळजी घेऊन ही आव्हान प्रक्रिया वैज्ञानिक कसोट्यांवर आयोजित करावी लागते. त्यासाठी आम्ही स्पष्टपणे म्हटलं की, ही आव्हान प्रक्रिया महाराजांच्या दरबारात पार पडणार नाही. ही प्रक्रिया नागपूरमधील सर्व पत्रकारांसमोर होईल.
त्यासाठी एक तटस्थ पंचसमिती नेमली जाईल,” असंही श्याम मानव यांनी नमूद केलं. कोण आहे बागेश्वर महाराज? बागेश्वर धामचे महाराज म्हटल्या जाणार्या या संताचा जन्म 1996 मध्ये छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात झाला होता, असे सांगितले जाते. असे म्हणतात की पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यात लहानपणापासूनच लोकांवर प्रभाव टाकण्याची क्षमता होती. काहीतरी नवीन करण्याची हिंमत त्याच्यात नेहमीच असायची.
म्हणूनच त्यांनी त्यांच्या गढा गावात असलेले शंकरजींचे प्राचीन मंदिर हे त्यांचे स्थान म्हणून निवडले.
या मंदिरात शंकराचे ज्योतिर्लिंग आहे. जे बागेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. 2016 मध्ये ग्रामस्थांच्या सहकार्याने येथे मोठा यज्ञ आयोजित करण्यात आला होता. त्यात श्री बालाजी महाराजांच्या मूर्तीचीही प्रतिष्ठापना करण्यात आली होती. तेव्हापासून हे ठिकाण बागेश्वर धाम म्हणून ओळखले जाऊ लागले. लोक इथे येऊ लागले.











