बिसलेरी ही बाटली बंद पाण्याच्या व्यवसायातील देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. 82 वर्षीय चौहान यांचे म्हणणे आहे की, भविष्यात बिसलेरीचा विस्तार करण्यासाठी त्यांच्याकडे योग्य उत्तराधिकारी नाही. चौहान यांची मुलगी जयंती हिलादेखील व्यवसायात रस नाही. त्यामुळे टाटा ग्रुप आपल्या कंपनीची योग्यरीत्या देखभाल आणि विस्तार करेल, असा विश्वास चौहान यांना आहे. बिसलेरी विकल्यानंतर चौहान या कंपनीत लहानशी हिस्सेदारीदेखील ठेवणार नाहीत. या व्यवसायामधून बाहेर पडल्यानंतर वॉटर हार्वेस्टिंग, प्लॅस्टिक रिसायकलिंगसारख्या उपक्रमांवर त्यांचा फोकस असेल.
रिलायन्स, नेस्लेदेखील होते स्पर्धेत
बिसलेरी कंपनीचा आपल्या ताफ्यात समावेश व्हावा, यासाठी रिलायन्स रिटेल, नेस्ले आणि डेनोन या कंपन्यादेखील शर्यतीत होत्या, परंतु चौहान यांनी टाटा ग्रुपलाच बिसलेरी विकण्याचा निर्णय घेतला. याबाबत चौहान म्हणाले, बिसलेरी कंपनी विकण्याचा निर्णय माझ्यासाठी खूप वेदनादायी होता, परंतु मला टाटाचे कल्चर आवडते म्हणून मी इतर कंपन्यांऐवजी टाटाला प्राधान्य दिले.











