महाविद्यालयीन प्रवेशावेळी विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीची तपासणी

0
42

महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया राबविताना जी महत्त्वाची कागदपत्रे महाविद्यालय, विद्यापीठ घेत असतात त्यात आता 18 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी केली आहे का? याची खात्रीदेखील केली जाणार आहे. पदवी प्रवेशावेळी वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यानी मतदार नोंदणी केली आहे का, याची पुढील शैक्षणिक वर्षापासून तपासणी सुरू करावी, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी राजभवन येथे पार पडलेल्या बैठकीत दिल्या आहेत.

राजभवन येथे राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर सर्व विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.

शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना सुरुवातीला अडचणी येऊ शकतात परंतु यातून सकारात्मक मार्ग दाखवत विद्यार्थी हितासाठी सर्वानी काम करावे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उत्कृष्ट अंमलबजावणी कशी करता येईल. याकडे कुलगुरूंनी लक्ष द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. तर विद्यापीठाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी आराखडा तयार करावा. त्या त्या भागातील शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन या धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये अधिकाधिक सुलभता कशी आणता येईल यासाठी प्रयत्न करावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

निवृत्त कुलगुरूंची समिती

वर्ष 2023 पासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार असून त्यासाठी सेवानिवृत्त कुलगुरू यांची समिती गठीत करण्यात येईल. या समितीच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी आणि त्यावर उपाययोजना याबाबत चर्चा करून शैक्षणिक धोरण अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी यावर उपाययोजना सुचविल्या जातील, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच येत्या शैक्षणिक वर्षांपासून चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याच्या सूचनाही पाटील यांनी कुलगुरूंना दिल्या.

Spread the love