मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी बत्ती अन् पब्लिक दोघेही ‘गुल’, कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलाच मेळावा सुपरफ्लॉप

0
40

मुख्यमंत्री झाल्यानंतर काल कोल्हापूर दौऱ्यात प्रथमच जयसिंगपूर येथे ‘जनसंवाद मेळावा’ घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू होताच अचानक वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे उपस्थित जनता उठून जाऊ लागल्याने ‘‘लाइट घालवली का? आता भाषण आटपावे लागेल,’’ असे म्हणायची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली. भाषणापूर्वीच नागरिकांनी पाठ फिरविल्याने हा पहिलाच मेळावा सुपरफ्लॉप ठरल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी रात्री जयसिंगपूर येथे जनसंवाद मेळाव्यासाठी आले होते. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर शिंदे गटात गेल्यानंतर हा पहिलाच मेळावा असल्याने मेळाव्यासाठी माणसे जमविण्यासाठी त्यांनी चांगलीच ‘उलाढाल’ केली होती. मात्र, नियोजित वेळेपेक्षा मेळावा तीन ते चार तास उशिरा सुरू झाल्याने नागरिक आधीच वैतागून गेले होते. सुमारे साडेआठच्या सुमारास मेळाव्यास सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करण्यास उभे राहिले. मात्र, उशीर झाल्याने उपस्थितांमध्ये चुळबूळ सुरू असतानाच अचानक वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे मुख्यमंत्री भाषण करताना माणसे उठून निघून जाऊ लागली. त्यामुळे ‘‘लाइट घालवली का? आता भाषण आटपावे लागेल,’’ असे मुख्यमंत्र्यांना म्हणावे लागले.

भाषण सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांनी ‘लाइट घालवली का?’ असे विचारल्याने खासदार धैर्यशील माने आणि आमदार राजेंद्र पाटील-यड्रवकर यांचे चेहरे मात्र पडल्याचे दिसत होते.

Spread the love