राज्यपाल भगतसिंह कोश्यारीसातत्याने वादग्रस्त विधान करत नव्या राजकीय वादाला तोंड फोडत आहेत. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद हे नवीन समीकरण झाली. राज्यपाल कोश्यारी आज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत.त्यांनी चक्क मुंबई हल्ल्यातील शहिदांना चप्पल घालून अभिवादन केलेय. यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यताय.
मुंबईतील पोलीस मुख्यालयात आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी २६/११ मुंबई अतिरेकी हल्ल्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यातील चप्पल बाजूला काढून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. मात्र राज्यपाल या प्रतिष्ठीत पदावर बसलेल्या भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई हल्ल्यातील शहिदांना चप्पल घालून अभिवादन केले. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून विरोधकांनी आता राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
दरम्यान, शहिदांच्या अभिवादन कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ व मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी पादत्राणे काढून हुतात्मा स्मारकात शहिदांना अभिवादन केले. पुष्पचक्र अर्पण केले. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांनी अभिवादनावेळी चप्पल काढली नाही. त्यामुळे ते पुन्हा एकदा वादात सापडलेत.










