विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाच्या मुद्द्यावरून विनाकारण वाद करण्यात येत आहे. यावर राजकीय वर्तुळातही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत अजित पवारांनी पत्रकारपरिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच आपला राजीनामा मागण्याचा अधिकार भाजपला नसल्याचेही त्यांनी खडसावले आहे.
आपण आजपर्यंत कुठल्याही महापुरुषांबद्दल, महिलांबाबत कधीही चुकीचं बोललेलो नाही. याआधी राज्यपालांनी राष्ट्रपुरुषांचा अपमान केला होता. बेताल वक्तव्य केलं होतं. जो शब्दप्रयोग करायला नको होता, तो त्यांनी केला होता. ते सर्व मी आपण मांडले होतं. मला एक कळत नाही, आता मागील दोन दिवसापासून भाजपाने त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिले, की तुम्ही अजित पवारांविरोधात आंदोलन करा आणि अजित पवारांचा राजीनामा मागा. मला भाजपाने विरोधीपक्षनेतेपद दिलेले नाही. मला राष्ट्रवादी काँग्रेसचे जे 53 आमदार आहेत, त्यांनी ते विरोधीपक्षनेते पद मला दिलेले आहे. त्यामुळे त्या पदावर मला ठेवायचं नाही ठेवायचं हा त्यांचा अधिकार आहे. बाकीच्यांना त्यामध्ये मागणी करण्याचा काहीच अधिकार नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, की मंत्री, आमदार, खासदारांनी आणि काही कार्यकर्त्यांनी मला फोन करून सांगितलं की, हे आम्हाला आंदोलन करायला सांगत आहेत आणि अजित पवार चुकीचे बोलले असे सांगत आहेत. मात्र आम्हालाही कळेना तुम्ही नेमकं काय चुकीचं बोलले आहात. परंतु आम्हाला आंदोलनचा काय पॅटर्न असला पाहिजे, अजित पवारांच्या फोटोला फुली आणि उर्वरीत मायना असं सगळं पाठवून दिलेलं आहे. आम्हाला सांगितलं आहे की, जिथे तुम्ही आंदोलन कराल त्याचा फोटो काढायचा आणि तो भाजपा कार्यालयास पाठवायचा. अशा पद्धतीने ते आंदोलन करायचं असं सांगितलं गेले, असे सांगत अजित पवार यांनी भाजपाच्या आंदोलनावर टीका केली.
आंदोलन करणाऱ्यांच्याही मनात किंवा ज्यांनी सांगितलं त्यांना मला विचारायचं, की महापुरुषांचा अपमान हा बेताल वक्तव्य करून, नको तो शब्दप्रयोग वापरून हा राज्यपालांनी केला आहे. मंत्र्यांनी केलेला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या जबाबदार मंत्र्यांचं विधानही आपल्यासमोर आहे. याशिवाय सत्तारुढ पक्षाच्या आमदारांनी शिवाजी महाराजांची उपमा मुख्यमंत्र्यांना दिली होती. प्रसाद लाड यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असा जावईशोध लावला होता. गोपीचंद पडळकरांनीही वादग्रस्त विधान केले होतं. अशा पद्धतीचे वक्तव्ये त्यांचे मंत्री, आमदार, राज्यपाल करत आहेत आणि त्याबद्दल हे काहीच बोलालयला तयार नाहीत. त्याबाबत त्यांच्यापैकी कोणीच माफी मागायला तयार नाही. या गोष्टीची नोंद राज्याने व आपण सगळ्यांनी घ्यावी, अशी भूमिकाही अजित पवार यांनी मांडली.










